Rahul Gandhi latest protest news: दोन दिवसापासून दिल्लीमध्ये जंतर-मंतर येथे CJPचे आंदोलन सुरु आहे, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी काल जंतर-मंतर येथे जाऊन CJP च्या आंदोलनाला पाठिंबा दिला. शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी आंदोलनाच्या ठिकाणी CJPचे संस्थापक अभिजीत दीपके यांची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा दिला.
नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणात विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी काँग्रेसनेही मंगळवारी आंदोलन केले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या खासदारांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील अधिकृत निवासस्थानाबाहेर अचानक ठिय्या आंदोलन करत केंद्र सरकारला अडचणीत आणले.
सुरवातीला या आंदोलनाची कल्पना राहुल गांधी आणि मल्लिकार्जून खर्गे यांनाच होती. आंदोलनाची रणनीती काँग्रेसच्या कुठल्याही खारदाराला माहित नव्हती. . त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत दिल्ली पोलिसांसह काँग्रेसच्या बहुतांश खासदारांनाही आंदोलनाचे ठिकाण माहिती नव्हते.
संसद परिसरात आंदोलकांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईनंतर काँग्रेसने अधिक आक्रमक भूमिका घेतली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि सरकारवर दबाव वाढवण्यासाठी राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्यासह काही मोजक्या नेत्यांनाच संपूर्ण आंदोलनाची माहिती होती. खासदारांना आधीच आंदोलनाची माहिती दिल्यास ती बाहेर जाऊन सुरक्षा यंत्रणा सतर्क होऊ शकते, अशी भीती राहुल गांधी आणि खर्गे यांना होती.
याच कारणामुळे काँग्रेसच्या खासदारांना वेगळेच कारण सांगण्यात आले. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या 10, राजाजी मार्ग येथील निवासस्थानी उपस्थित राहण्याचे निर्देश खासदारांना देण्यात आले. पंतप्रधान मोदींचे 7, लोककल्याण मार्ग येथील निवासस्थान आणि खर्गे यांचे निवासस्थान यांमध्ये 500 मीटरचे अंतर आहे.
वाढदिवसाचा कार्यक्रम संपल्यानंतर राहुल गांधी यांनी उपस्थित खासदारांना कोणतेही स्पष्टीकरण न देता फक्त आपल्या ताफ्याच्या मागे चालत येण्यास सांगितले. खासदारांनीही कोणताही प्रश्न न विचारता राहुल गांधी यांच्या मागे चालण्यास सुरुवात केली.
थोड्याच वेळात सर्वजण पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर पोहोचले. तेथे राहुल गांधी यांनी अचानक सर्वांना बसण्याचे आवाहन केले आणि त्याच ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. या घडामोडीमुळे उपस्थित खासदारांनाही सुरुवातीला आश्चर्याचा धक्का बसल्याची चर्चा आहे.
राहुल गांधी आणि काँग्रेसच्या खासदारांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर घोषणाबाजी सुरू करत केंद्र सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली. आंदोलनाची माहिती काही मिनिटांतच प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचली. त्यानंतर अनेक पत्रकार घटनास्थळी दाखल झाले.
यानंतर काँग्रेसचे इतर नेते, कार्यकर्तेही आंदोलनात सहभागी झाले. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही आंदोलनस्थळी येत राहुल गांधींना पाठिंबा दर्शवला. त्यामुळे आंदोलनाचे स्वरूप अधिक मोठे झाले.
संसद परिसरात झालेल्या आंदोलनानंतर दिल्ली पोलिसांनी सुरक्षा वाढवली होती. तरीही काँग्रेसचे खासदार थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानापर्यंत पोहोचल्याने सुरक्षा यंत्रणांमध्ये एकच खळबळ उडाली. आंदोलन सुरू झाल्यानंतर वरिष्ठ अधिकारी आणि सुरक्षा यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.
राहुल गांधी आणि काँग्रेसचे खासदार जवळपास तीन तास पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या देऊन बसले होते. अखेर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दिल्ली पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्यांना तेथून हटवले.
या आंदोलनामुळे काँग्रेसने नीट पेपरफुटीचा मुद्दा राष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा चर्चेत आणला. अत्यंत गुप्त रणनीती आखून थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्यात काँग्रेसला यश आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दुसरीकडे, सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून या संपूर्ण घटनेचे राजकीय पडसाद पुढील काही दिवस उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.