Rahul Gandhi Satya Pal Malik Interview:  Sakarnama
देश

Rahul Gandhi Satya Pal Malik Interview: मोदी सरकारबाबत सत्यपाल मलिकांचे मोठे विधान; मी लिहून देतो...

अनुराधा धावडे

New Delhi Political News : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या आरोपांनी देशभरात एकच खळबळ माजली होती. पुलवामा हल्ल्याबाबत त्यांनी केलेल्या दाव्यांमुळे खुद्द पंतप्रधानांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. विरोधकांनीही हा मुद्दा चांगलाच लावून धरला होता.

हा वाद काहीसा कमी झालेला असतानाच आता काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सत्यपाल मलिकांची भेट घेत त्यांची मुलाखत घेतली आहे. यामध्ये त्यांनी शेतकरी आंदोलन आणि पुलवामा हल्ल्यासह अनेक मुद्द्यांवर भाष्य करत केंद्र सरकारवर निशाणा साधला. ही मुलाखत ट्विटरवर शेअर करत, "या भेटीमुळे ईडी-सीबीआयची पळापळ वाढेल का?" असा सवाल उपस्थित केला आहे. इतकेच नव्हे, तर मी लिहून देतो यापुढे मोदी सरकार निवडून येणार नाही, असा दावाही त्यांनी केला आहे.

जम्मू-काश्मीरबाबत काय झाले?

राहुल गांधींनी सत्यपाल मलिकांना विचारले, तुम्ही जेव्हा जम्मू-काश्मीरमध्ये होता तो काळ खूप गुंतागुंतीचा होता. यावर तुमचे काय मत आहे? सत्यपाल मलिक म्हणाले, तुम्ही बळाच्या किंवा लष्कराच्या ताकदीवर जम्मू-काश्मीरमधील समस्या सोडवू शकत नाही. त्यासाठी इथल्या लोकांची मने जिंकून तुम्ही काहीही करू शकता. तसेच, जम्मू-काश्मीरचे प्रश्न सोडवायचे असतील, तर त्याआधी जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा परत दिला पाहिजे.

केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला आहे. पोलिस बंड करतील, असे त्यांना वाटले होते, परंतु पोलिस सरकारशी एकनिष्ठ राहिले. पोलिसांनी ईदच्या महिन्यात सुटीही घेतली नाही. अशा परिस्थितीत राज्याचा दर्जा देऊन निवडणुका घ्याव्यात, असेही सत्यपाल मलिकांनी या वेळी सुचवले.

यावर राहुल गांधी म्हणाले, मी जेव्हा जम्मू-काश्मीरमध्ये गेलो होतो. तेव्हा मलाही वाटले होते की, राज्याचा दर्जा हिसकावून घेतल्याने लोक खूष नाहीत. यानंतर सत्यपाल मलिक म्हणाले की, जेव्हा मी केंद्र सरकारकडे जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याची विनंती केली, त्यावेळी सर्व काही ठीक आहे, असे सांगत मला शांत बसण्यास सांगितले.

पुलवामा येथे काय बोलले होते?

पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याबाबत बोलताना सत्यपाल मलिक म्हणाले, मी असे म्हणत नाही की, केंद्र सरकारने हे केले. परंतु पुलवामामध्ये केंद्र सरकारने दुर्लक्ष केले आणि नंतर त्याचा राजकीय वापर केला.

राहुल गांधी या घटनेबाबत बोलताना म्हणाले, "जेव्हा मी पुलवामा हल्ल्याबाबत ऐकले, तेव्हा शहिदांचे पार्थिव विमानतळावर पोहोचले होते. मी विमानतळावर पोहोचलो, पण मला तिथेच एका खोलीत बंद करण्यात आले. मी भांडून बाहेर आलो, पण त्यावेळी विमानतळावर एक कार्यक्रमच आयोजित केलाय की काय, अशा पद्धतीचे वातावरण तयार झाले होते.

सत्यपाल मलिक म्हणाले की, सीआरपीएफने सैनिकांसाठी गृहमंत्रालयाकडे पाच विमाने मागितली होती. विमान मागणीचा अर्ज चार महिने गृहमंत्रालयात पडून राहिला, पण गृहमंत्रालयाने लष्कराची मागणी फेटाळून लावली. त्यामुळे त्यांनी रस्त्याने जाण्याचा पर्याय निवडला. या हल्ल्यासाठी आणलेली सर्व स्फोटके पाकिस्तानातून आणली गेली होती.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT