Amit Shah, Rahul Gandhi, Narendra Modi Sarkarnama
देश

Rahul Gandhi News : मोदी-शहांसोबतच्या बैठकीतच राहुल गांधींची नाराजी; दोघांनाही दिले असहमती पत्र...

Chief Election Commission Selection PM Narendra Modi Amit Shah : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने ज्ञानेश कुमार यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून निवड केली आहे.

Rajanand More

New Delhi News : देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीवरून पुन्हा वाद निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली सोमवारी निवड समितीची बैठक झाली. या समितीने ज्ञानेश कुमार यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. समितीचे सदस्य व विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी तर बैठकीतच नाराजी व्यक्त केल्याचे समोर आले आहे.

ज्ञानेश कुमार हे सध्या केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये निवडणूक आयुक्त आहेत. ते आता राजीव कुमार यांची जागा घेतील. मात्र, त्यांची निवड वादात सापडली आहे. काँग्रेसकडून सुप्रीम कोर्टात धाव घेतली जाणार आहे. यापूर्वीच काँग्रेसने निवड समितीतून सरन्यायाधीशांना वगळण्याच्या निर्णयाविरोधा कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. त्यावर 19 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.

सुप्रीम कोर्टातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी समितीची बैठक झाली. या बैठकीसाठी पंतप्रधान मोदींसह अमित शाह व राहुल गांधीही उपस्थित होते. या बैठकीमध्ये राहुल यांनी मोदी आणि शहांना असहमती पत्र देत बैठक पुढे ढकलण्याची विनंती केली होती. हे पत्र राहुल यांनी सोशल मीडियात टाकून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

काय म्हटले होते पत्रात?

सरकारी हस्तक्षेपापासून मुक्त असलेल्या निवडणूक आयोगाचा सर्वात मूलभूत पैलू म्हणजे निवडणूक आयुक्त आणि मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड प्रक्रिया. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन करून आणि सरन्यायाधीशांना समितीमधून काढून टाकत मोदी सरकारने निवडणूक प्रक्रियेबाबत मतदारांच्या चिंता वाढवल्या आहेत, असा थेट निशाणा पत्रात साधण्यात आला आहे.

लोकप्रतिनिधी म्हणून बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्राच्या संस्थापक नेत्यांचे आदर्श राखणे, हे माझे कर्तव्य आहे. समितीची रचना आणि प्रक्रियेला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलेले असताना आणि 48 तासांपेक्षा कमी वेळात त्यावर सुनावणी होणार असताना, पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी नवीन मुख्य निवडणूक आयुक्त निवडण्याचा निर्णय घेणे, हे अनादरपूर्ण आहे, असे नाराजी राहुल यांनी पत्रात व्यक्त केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT