Vasundhara Raje, Ashok Gehlot News Sarkarnama
देश

Rajasthan Assembly Election : सत्ता कुणाचीही असो राजस्थानमध्ये 20 वर्षांपासून गेहलोत अन् वसुंधरा राजेंचाच जलवा

Amol Jaybhaye

Rajasthan Politics News : राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मागील अनेक वर्षांपासून राज्यात सत्ताबदल होतो, पण मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून येतात. या दोघांचा प्रभाव आपापल्या विधानसभा मतदारसंघात आणि जनतेमध्ये कायम आहे. 1999 पासून सरदारपुरा विधानसभा निवडणुकीत अशोक गेहलोत यांचे वर्चस्व आहे, तर 2003 पासून वसुंधरा राजे या झालरापाटनमध्ये वर्चस्व गाजवत आहेत.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे हे राजस्थानमधील दोन मोठे नेते आहेत. ज्यांच्या धुरीवर गेल्या अडीच दशकांपासून राज्याचे राजकारण चालले आहे. आजपर्यंत काँग्रेस (Congress) वसुंधरा राजे यांना आणि भाजप अशोक गेहलोत यांना हरवू शकले नाही. या बलाढ्य उमेदवारांच्या तुलनेत इतर कोणताही उमेदवार दिला तरी त्यांचा चेहरा फिका पडतो.

सत्ता कुणाचीही असो राजस्थानमध्ये (Rajasthan) गेहलोत आणि वसुंधरा राजेंना आव्हान देणारा उमेदवार अद्याप सापडलेला नाही, हा ट्रेंड गेल्या 20 वर्षांपासून सुरू आहे. जोधपूरच्या सरदारपुरा जागेवर मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि झालावाडच्या झालरापाटन जागेवर माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या विरोधात भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना अद्याप उमेदवार मिळू शकलेला नाही. अशा स्थितीत विधानसभा निवडणुकीत पक्षांना या वेळी तरी तगडे उमेदवार देता येतील का ? अशी चर्चा आहे.

गेहलोत आणि वसुंधरा राजे यांचा प्रभाव दोन दशकांपासून अबाधित आहे. तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले गेहलोत आपल्या सरकारच्या योजना, 10 हमी आणि व्हिजन 2030 च्या जोरावर चौथ्यांदा मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्नशील आहेत, तर दोन वेळा माजी मुख्यमंत्री असतानाही सर्व प्रतिकूल परिस्थितीत वसुंधरा राजे झालावाडच्या झालरापाटनमधून विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. आमदार, माजी आमदार आणि त्यांच्या गटातील नेत्यांनाही त्यांना पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर पाहायचे आहे.

त्यामुळेच भाजपच्या (BJP) 41 उमेदवारांच्या पहिल्या यादीत वसुंधरा यांच्या गटातील नेत्यांची तिकिटे कापण्यात आल्यानंतर विरोध आणि बंडखोरीचा आवाज घुमू लागला आहे. 'वसुंधरा नाही, सत्ता नाही' असे वातावरण भाजपमधील असंतुष्ट निर्माण करत आहेत. याकडे राजकीय मुत्सद्देगिरी आणि शक्तिप्रदर्शन म्हणूनही पाहिले जात आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT