BJP Sarkarnama
देश

भाजपच्या प्रदेशाध्यक्षांची जीभ घसरली; म्हणाले, काळ्या नवरीला...

भाजपच्या प्रदेशाध्यक्षांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मोठा गदारोळ उडाला आहे.

सरकारनामा ब्युरो

जयपूर : भाजपच्या (BJP) प्रदेशाध्यक्षांनी अर्थसंकल्पाची तुलना काळ्या नवरीशी केल्याने वाद सुरू झाला आहे. राजस्थानचे (Rajasthan) भाजप प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया (Satish Poonia) यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. यावर प्रतिक्रिया देताना पुनिया यांची जीभ घसरली. यावरून विरोधकांनी पुनिया यांना घेरले असून, त्यांच्याकडे माफीनाम्याची मागणी केली आहे.

राज्याचा अर्थसंकल्प हा वरवरची मलमपट्टी करणारा आहे. हे म्हणजे एखाद्या काळ्या नवरीला ब्युटी पार्लरमध्ये नेऊन नंतर तिचा चांगला मेकअप करून सगळ्यांसमोर उभे करण्यासारखे आहे. यापेक्षा अधिक अर्थसंकल्पात काहीही नाही, असे पुनिया अर्थसंकल्पावर पत्रकारांशी बोलताना म्हणाले. यानंतर पुनिया यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. महिला आयोगानेही या प्रकरणी दखल घेतली असून, पुनिया यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. काँग्रेसने यावरून भाजपसह पुनिया यांना लक्ष्य केले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंह डोटासरा म्हणाले की, पुनिया यांच्या अशा प्रकारच्या बेजबाबदार बोलण्यामुळे महिलांच्या केवळ अपमान झाला नसून, त्यांच्या प्रतिष्ठेलाही धक्का बसला आहे. महिला, बहिणी आणि मुलींबद्दल अपमानजनक बोलणे हे भाजपच्या डीएनएमध्येच आहे.

पुनिया हे कायम त्यांच्या वक्तव्यामुळे कायम चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी मोठी प्रतिज्ञा करून खळबळ उडवून दिली होती. राजस्थानमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. राजस्थानमध्ये सध्या मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात बोलताना पुनियांनी ही जाहीर प्रतिज्ञा केली होती. जाहीर सभेत बोलताना पुनिया म्हणाले होते की. राजस्थानमधील काँग्रेस सरकार हे तरुणविरोधी आणि शेतकरीविरोधी आहे. या सरकारला सत्तेतून घालवल्याशिवाय मी हार आणि फेटा घालणार नाही. याचबरोबर रात्रीचे जेवणही मी घेणार नाही. राज्यात पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत भाजपचीच सत्ता येईल.

पुनिया यांनी ही घोषणा केली असली तरी अशीच घोषणा मागील विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांनी केली होती. राजस्थानमध्ये 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला फटका बसला होता. राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन होईपर्यंत फेटा न घालण्याची प्रतिज्ञा केली होती. राज्यात 2018 मध्ये काँग्रेसचे सरकार आल्यानंतर अखेर त्यांनी फेटा घातला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT