Congress  
देश

आमदारकी वाचवेल त्या पक्षात जाऊ; 'त्या' सहा आमदारांचा काँग्रेसला इशारा

सहा आमदार 2019 मध्ये काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : एखाद्या पक्षाच्या तिकीटावर निवडून आल्यानंतर दुसऱ्या पक्षात दाखल झाल्यास पक्षांतर बंदी कायद्यांतील तरतुदींमुळे त्यांची आमदारकी रद्द होऊ शकते. हीच टांगती तलवाल काँग्रेसमध्ये (Congress) दाखल झालेल्या बहुजन समाज पक्षाच्या (BSP) सहा आमदारांवर आहे. पक्षांतर केल्यानंतर काँग्रेसनं वाऱ्यावर सोडल्याचा दावा या आमदारांनी केला आहे. त्यामुळं आता आमदारकी टिकवण्यासाठी आता कोणत्याही पक्षाचा आसरा घेण्याचा पवित्रा या आमदारांनी घेतला आहे. एकप्रकारे हा काँग्रेसला इशारा असल्याचे मानले जात आहे.

राजस्थानमधील (Rajsthan) बसपाचे सहा आमदार 2019 मध्ये काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. आमदार राजेंद्र सिंह गुढा, वाजिब अली, संदीप कुमार, लाखन सिंह, जोगिन्द्र सिंह अवाना आणि दीपचंद खैरिया अशी या आमदारांची नावं आहेत. त्यांनी पक्षांतर केल्यानंर त्याविरोधात बसपाकडून सर्वोच्च न्यायालयात पक्षांतरबंदी कायद्यानुसार त्याला आव्हान देण्यात आलं. आता न्यायालयानं या आमदारांना पुढील चार आठवड्यात आपलं म्हणणं सादर कऱण्याचे आदेश दिले आहेत.

न्यायालयामध्ये चार आठवड्यानंतर पुढील सुनावणी होणार असून त्यामध्ये सहाही जणांची सदस्यता रद्द होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळं या आमदारांची धापवळ सुरू झाली आहे. त्यापैकी चार आमदार बुधवारी दिल्लीत दाखल झाले आहेत. काँग्रेसमध्ये दाखल झाल्यानंतर एकालाही मंत्रिपद किंवा इतर महत्वाचं पद मिळालेलं नाही. तसेच सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी चांगले वकीलही देण्यात आले नाहीत, असा दावा या आमदारांनी केला आहे.

आमदार गुढा म्हणाले, 'सदस्यता वाचवण्यासाठी कायदेशीर उपाय शोधण्यासाठी दिल्लीत आलो आहोत. आमचे तर आता घरही वाचणार नाही, असे दिसते. आता आमची प्राथमिकता आमदारकी वाचविणे ही आहे. राहुल गांधी यांच्यासह जे भेटतील त्यांना भेटू.' तर आमदार संदीप यादव वाजित अली यांनी आता आम्हाला आसरा हवा आहे, असे सांगितले. मायावती, अमित शहा किंवा राहुल गांधी यांच्यापैकी जे आसरा देतील, त्यांना भेटू. यापैकी जे आमची आमदारकी वाचवतील, आम्ही त्यांच्याकडे जाऊ. जनतेच्या विकासासाठी निवडून आलो आहोत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आमदारकी जाऊ देणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, या सहा आमदारांची आमदारकी रद्द झाली तरी राजस्थान सरकारला कोणताही धोका नाही. 200 सदस्य संख्या असलेल्या विधानसभेत काँग्रेसच्या 106 आमदारांसह 13 अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. एक आरएडी आमदार, दोन सीपीएम आमदारांचाही पाठिंबा आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडे एकूण 122 आमदारांचा पाठिंबा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT