BJP leadership change : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून पक्षाचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्त्यांना अनेकदा आश्चर्याचा धक्का दिला जातो. मग तो भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीचा मुद्दा असो की मुख्यमंत्र्यांची निवड. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना थेट राज्यसभेत पाठवून भाजपकडे मुख्यमंत्रिपद खेचण्याच्या त्यांच्या रणनीतीने भल्याभल्यांना चकविले. आता मोदी-शहांकडून आणखी एक धक्का देण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे.
बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार हे लवकरच पदाचा राजीनामा देतील. त्यानंतर या राज्यात पहिल्यांदाच भाजपकडे मुख्यमंत्रिपद येईल. एकीकडे ही चर्चा सुरू असताना राजस्थानमध्येही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची खुर्ची धोक्यात आल्याची चर्चा रंगली आहे. मागील काही दिवसांत घडलेल्या घडामोडींमुळे त्याचे संकेत मिळत आहेत.
भजनलाल यांच्यासह उपमुख्यमंत्री दिया कुमारी हे दोघे काल दिल्लीत होते. शर्मा यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याचे समोर आले आहे. दिया कुमारी यांनीही राजस्थानातील बडे नेते गजेंद्र सिंह शिखावत यांच्यासह अन्य काही नेत्यांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वीच भाजपचे बडे नेते किरोडी लाल मीणा यांनी दिल्ली दौरा करत शाह आणि शेखावत यांची भेट घेतली होती.
माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे दहा दिवसांपूर्वीच कुटुंबासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला दिल्लीत आल्या होत्या. नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्याने मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना उधाण आले आहे. काही स्थानिक वृत्तपत्रांमध्ये तशा बातम्याही प्रसिध्द होऊ लागल्या आहेत. यामध्ये गजेंद्र सिंह शेखावत यांच्या नाव आघाडीवर असल्याचेही सांगितले जात आहे.
भजनलाल यांनी डिसेंबर २०२३ मध्ये मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. पुढील काही दिवसांत त्यांना या पदावर अडीच वर्षे पूर्ण होत आहेत. निवडणुकीसाठी अजूनही अडीच वर्षांचा कालावधी आहे. त्यामुळे पुढील अडीच वर्षांची टर्म शेखावत यांना दिली जाणार असल्याची चर्चा आहे. वसुंधरा राजे यांच्याकडूनही फिल्डींग लावण्यात आल्याचे संकेत मिळत आहेत.
वसुंधरा राजे यांना २०२३ मध्येच मुख्यमंत्रिपदाची अपेक्षा होती. मात्र, त्यावेळी त्यांचा पत्ता कट झाला होता. त्यांनी याबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. आता सरकारला अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यासाठी काही दिवस बाकी असतानाच नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री बदल झाला तरी शेखावत किंवा वसुंधरा राजे यांच्या गळ्यात माळ पडणार की मोदी-शाह पुन्हा धक्का देत नव्या चेहऱ्याला संधी देणार, हे लवकरच समजेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.