Rajasthan IAS Corruption : सरकारी अधिकारी आणि त्यांच्याकडे असलेली अमाप संपत्ती हा नेहमीच चर्चेचा आणि वादाचा विषय राहिला आहे. जनतेच्या सेवेसाठी आणि प्रशासनात पारदर्शकता राखण्यासाठी असलेल्या अधिकारांचा काही अधिकारी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापर करत असल्याचे आरोप वारंवार समोर येतात. भ्रष्टाचार, पदाचा गैरवापर आणि उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमा करण्याच्या प्रकरणांमुळे प्रशासनाच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होते.
असाच एक धक्कादायक प्रकार राजस्थानमधून समोर आला आहे. एका IAS अधिकाऱ्याने आपल्या पदाचा गैरवापर करून खासगी कंपनीला फायदा मिळवून दिल्याचा आणि त्याच कंपनीच्या रिसॉर्टमध्ये कुटुंबीयांच्या नावावर तब्बल 40 विला आणि कॉटेज खरेदी केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, या मालमत्ता पुन्हा त्याच कंपनीला भाडेतत्त्वावर देण्यात आल्याचा दावा असून, त्यातून दरवर्षी सुमारे 1.8 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणामुळे राजस्थानच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
IAS अधिकारी शिखर अग्रवाल आणि पत्नी चर्चेत
या प्रकरणात IAS अधिकारी शिखर अग्रवाल आणि त्यांच्या पत्नी वरिष्ठ IPS अधिकारी प्रशाखा माथुर चर्चेत आल्या आहेत. शिखर अग्रवाल यांना यापूर्वीच APO (पुढील नियुक्तीच्या प्रतीक्षेत) ठेवण्यात आले आहे. त्यानंतर आता शनिवारी राजस्थान सरकारने त्यांच्या पत्नी प्रशाखा माथुर यांनाही APO केले आहे. राजस्थानच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) 30 ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या निवेदनात या प्रकरणातील प्राथमिक तपासाची माहिती दिली.
शिखर अग्रवाल यांनी गोयल फॅशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संचालकांशी संगनमत करून कंपनीला अनुचित लाभ मिळवून दिल्याचे प्रथमदर्शनी पुरावे आढळल्याचा दावा ACB ने केला आहे. ही कंपनी 'अनंता' ब्रँडअंतर्गत रिसॉर्ट्स चालवते. आरोपानुसार, अग्रवाल यांनी विविध सरकारी पदांवर कार्यरत असताना कंपनीला रिसॉर्ट उभारणीसाठीच्या नियमांमध्ये सवलती मिळवून दिल्या.
आवश्यक प्रमाणपत्रांची योग्य पडताळणी न करताच मंजुरी देण्यात आली. तसेच कंपनीला अनुकूल अटींवर विशेष आर्थिक पॅकेजही देण्यात आले. या निर्णयांमुळे राज्य सरकारचे आर्थिक नुकसान झाल्याचा संशय तपास यंत्रणेने व्यक्त केला आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी राजस्थान सरकारने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 17A अंतर्गत परवानगी दिली आहे.
अडीच वर्षांत कुटुंबीयांच्या नावावर 40 विला आणि कॉटेज
ACB च्या तपासानुसार, सप्टेंबर 2023 ते मार्च 2026 या अडीच वर्षांच्या कालावधीत शिखर अग्रवाल आणि त्यांच्या कुटुंबीयांनी उदयपूरमधील बुझदा आणि अलवरमधील अजबगड येथील दोन अनंता रिसॉर्ट्समध्ये एकूण 40 मालमत्ता खरेदी केल्या. या मालमत्तांची एकूण किंमत सुमारे 6.16 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
ACB च्या माहितीनुसार, उदयपूरमध्ये 10-10 विला शिखर अग्रवाल आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर खरेदी करण्यात आले. अलवरमधील मालमत्ताही कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावावर नोंदवण्यात आल्या आहेत. यातील काही विला बाजारभावापेक्षा कमी किमतीत खरेदी केल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे.
या प्रकरणातील सर्वाधिक चर्चेचा मुद्दा म्हणजे मालमत्तांच्या खरेदी आणि त्यानंतर झालेला भाडेकरार. कुटुंबीयांच्या नावावर खरेदी केलेल्या या मालमत्ता पुन्हा त्याच कंपनीला लीजवर देण्यात आल्याचा आरोप आहे. या व्यवहारातून अग्रवाल कुटुंबाला दरवर्षी सुमारे 1.8 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सरकारी पदावर असताना संबंधित कंपनीला दिलेल्या कथित सवलती आणि त्याच कंपनीसोबत केलेले मालमत्ता व्यवहार यांचा परस्पर संबंध आहे का, याचा तपास ACB करत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.