Someshwar Sugar Factory : सोमेश्वरच्या अध्यक्षपदाचा मुहूर्त ठरला; 8 नावांची चर्चा; दोन स्वीकृत संचालकांच्या निवडीकडेही लक्ष

Someshwar Sugar Factory chairman election : सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत यंदा तिरंगी लढत झाली होती. माजी अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी स्वतंत्र पॅनेल उभे केले होते, तर युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलनेही निवडणुकीत आव्हान दिले होते. मात्र, सभासदांनी सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलच्या सर्व २९ उमेदवारांना विजयी केले.
Someshwar Sugar Factory Election
Someshwar Sugar Factory ElectionSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News, 01 Nov : बारामतीच्या राजकारणात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. येत्या ५ नोव्हेंबरला कारखान्याच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड होणार आहे. मात्र, या पदांवर नेमकी कोणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. कारखान्याच्या निवडणुकीत २१ पैकी २१ जागांवर विजय मिळविल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आता अध्यक्षपदासाठी कोणाला संधी देणार, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

अध्यक्षपदासाठी अनुभवी नेतृत्वाला पुन्हा संधी मिळणार की नव्या पिढीतील चेहऱ्याला संधी देऊन नेतृत्वात बदल केला जाणार, यावरून सध्या चर्चा सुरू आहे. राजवर्धन शिंदे, प्रमोद काकडे, सुनील भगत, संग्राम सोरटे, अभिजित काकडे, ऋषिकेश गायकवाड, विक्रम भोसले आणि उत्तम धुमाळ या आठ नावांची चर्चा आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत यंदा तिरंगी लढत झाली होती. माजी अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी स्वतंत्र पॅनेल उभे केले होते, तर युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलनेही निवडणुकीत आव्हान दिले होते. मात्र, सभासदांनी सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलच्या सर्व २९ उमेदवारांना विजयी केले. या निकालानंतर आता कारखान्याच्या सत्तेची सूत्रे कोणाकडे सोपवायची, याचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, २०१४ मधील नियम ७७ अन्वये ५ नोव्हेंबरला नवनिर्वाचित संचालक मंडळाची सभा होणार आहे. प्राधिकृत अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडेल. कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. एन. यादव यांनी यासंदर्भातील नोटीस प्रसिद्ध केली आहे.

अध्यक्षपदासाठी आठ नावांची चर्चा; अनुभवाला की तरुणाईला संधी?

अध्यक्षपदाच्या चर्चेत राजवर्धन शिंदे यांचे नाव प्रामुख्याने घेतले जात आहे. त्यांनी यापूर्वी दोन वेळा कारखान्याचे अध्यक्षपद भूषविले असून, संचालक म्हणून त्यांची ही चौथी टर्म आहे. कारखान्याच्या कामकाजाचा अनुभव आणि सहकार क्षेत्रातील त्यांचा वावर यामुळे त्यांच्या नावाची चर्चा आहे.

जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रमोद काकडे यांचे नावही चर्चेत आहे. त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून दोन वेळा काम केले असून, बांधकाम आणि आरोग्य सभापतीपदाची जबाबदारी सांभाळली आहे. कारखान्याच्या संचालकपदाचा अनुभव आणि शेतकऱ्यांशी असलेला संपर्क यामुळे त्यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो.

Someshwar Sugar Factory Election
Raj Thackeray : बाळासाहेब ठाकरे राऊतांना शिव्या द्यायचे; पण 'त्या' एका गोष्टीमुळे थेट संपादक बनवलं : राज ठाकरेंनी सांगितला जुना किस्सा

सामाजिक समीकरणांचा विचार होणार?

अध्यक्षपदाच्या निवडीत सामाजिक समीकरणांचाही विचार होण्याची शक्यता आहे. ओबीसी चेहरा म्हणून संग्राम सोरटे आणि सुनील भगत यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. नवनाथ उद्योग समूहाचे अध्यक्ष असलेले संग्राम सोरटे आणि कोन्हाळे येथील चार वेळा संचालक राहिलेले सुनील भगत यांच्यापैकी कोणाला संधी मिळते, याकडेही लक्ष आहे.

दुसरीकडे, युवा नेतृत्वाला संधी देण्याचा निर्णय झाल्यास ऋषिकेश गायकवाड आणि अभिजित काकडे यांच्या नावांचा विचार होऊ शकतो. दोघांचीही संचालक म्हणून दुसरी टर्म आहे. तरुण नेतृत्वाला संधी देण्याचा निर्णय झाल्यास ही नावे चर्चेत येऊ शकतात. याशिवाय खरेदी-विक्री संघाचे अध्यक्षपद भूषविलेले विक्रम भोसले आणि कारखान्याचे माजी उपाध्यक्ष उत्तम धुमाळ यांचीही नावे चर्चेत आहेत.

Someshwar Sugar Factory Election
Teacher Recruitment : शिक्षक भरतीतील संस्थाचालकांचा हस्तक्षेप अन् मनमानी टाळण्यासाठी शिक्षण विभागाचा मोठा निर्णय; मुलाखतीचे अधिकार पण...

उपाध्यक्षपद आणि स्वीकृत संचालकांच्या निवडीचेही गणित

अध्यक्षपदाबरोबरच उपाध्यक्षपदाची निवडही महत्त्वाची ठरणार आहे. कारखान्याच्या पाच गटांतील संचालकांना टप्प्याटप्प्याने उपाध्यक्षपदाची संधी देण्याची परंपरा कायम राहणार का, याबाबत उत्सुकता आहे. तसेच निवडणुकीपूर्वी राजकीय समीकरणे जुळविताना अनेक इच्छुकांना संधी देता आली नसल्याने दोन स्वीकृत संचालकांच्या जागांवर कोणाची वर्णी लागणार, याचीही चर्चा सुरू झाली आहे.

नव्या अध्यक्षांसमोर केवळ पदाची जबाबदारी नसेल, तर कारखान्याचा कारभारही महत्त्वाचा ठरणार आहे. ऊस उत्पादकांना योग्य दर देणे, कारखान्याची आर्थिक स्थिती मजबूत करणे, पारदर्शक कारभार आणि आगामी गळीत हंगामाचे नियोजन अशी आव्हाने नव्या नेतृत्वासमोर असतील. त्यामुळे ५ नोव्हेंबरला अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याबरोबरच सुनेत्रा पवार कारखान्याच्या नेतृत्वासाठी अनुभवाला प्राधान्य देतात की युवा चेहऱ्याला संधी देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.