Rajnath Singh  Sarkarnama
देश

Rajnath Singh : सर क्रीकचा वाद तापला : राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला कराचीचा अल्टिमेटम

Rajnath Singh Sir Creek dispute : विजयादशमीच्या दिवशी कच्छमधील लक्की नाला लष्करी छावणीत झालेल्या बहु-एजन्सी क्षमता सराव व शस्त्र पूजन सोहळ्यात ते बोलत होते.

Rashmi Mane

Rajnath Singh News : भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला कडक इशारा देत सर क्रीक भागात पाकिस्तानने कोणतेही दुस्साहस केल्यास भारत निर्णायक आणि जबरदस्त प्रत्युत्तर देईल, असे स्पष्ट केले. विजयादशमीच्या दिवशी कच्छमधील लक्की नाला लष्करी छावणीत झालेल्या बहु-एजन्सी क्षमता सराव व शस्त्र पूजन सोहळ्यात ते बोलत होते.

सर क्रीक विवाद पुन्हा चर्चेत

राजनाथ सिंह म्हणाले, "जर पाकिस्तानने सर क्रीक परिसरात काहीही दुस्साहस केली तर त्याला असे प्रत्युत्तर मिळेल की, इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलतील." त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की कराचीपर्यंत जाण्याचा मार्ग सर क्रीकमधून जातो आणि भारताने 1965 च्या युद्धात लाहोरपर्यंत जाण्याची क्षमता दाखवली होती. त्यामुळे 2025 मध्येही भारत आपल्या सीमा आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यास पूर्ण सक्षम आहे,

राजनाथ सिंह म्हणाले की, भारताने वारंवार चर्चेच्या माध्यमातून सीमा विवाद सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र पाकिस्तानची हेतू सुरुवातीपासूनच संशयास्पद आहे. अलीकडे पाकिस्तानने सर क्रीकजवळ सैन्य तळांचा विस्तार सुरू केला असून ही परिस्थिती चिंताजनक आहे. "आज स्वातंत्र्याला 78 वर्षे उलटली, तरी पाकिस्तान हा वाद पुन्हा उकरून काढत आहे."

भारतीय सेना आणि बीएसएफ दोन्ही मिळून देशाच्या सीमांची सतत दक्षतेने राखण करत आहेत. “जर सर क्रीक परिसरात पाकिस्तानने दुस्साहस केले, तर त्याला असा निर्णायक दणका दिला जाईल की इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलतील,” असा इशारा त्यांनी दिला. 1965 च्या युद्धात भारतीय सेनेने लाहोरपर्यंत पोहोचण्याची क्षमता दाखवली होती, तसेच "कराचीचा मार्ग सर क्रीकमधूनही जातो" हे पाकिस्तान विसरू नये, असेही सिंह यांनी स्पष्ट केले.

सर क्रीक म्हणजे काय?

सर क्रीक हा गुजरातच्या कच्छ जिल्हा आणि पाकिस्तानच्या सिंध प्रांताच्या सीमेवर असलेला अंदाजे 96 किलोमीटर लांबीचा खाडीपट्टा आहे. दलदलीच्या जमिनीमुळे या परिसराचे स्वरूप गुंतागुंतीचे आहे. भौगोलिक दृष्ट्या संवेदनशील असण्याबरोबरच या भागाला आर्थिक महत्त्वदेखील प्रचंड आहे. येथे माशांच्या प्रचंड संपत्तीबरोबर तेल व वायूचे साठे असल्याचे मानले जाते. त्यामुळेच दोन्ही देश या प्रदेशावर दावा करतात.

पाकिस्तानच्या हालचालींवर चिंता

स्वातंत्र्याला 78 वर्षे पूर्ण झाल्यानंतरही हा सीमा विवाद सुटलेला नाही. भारताने अनेकदा चर्चेच्या माध्यमातून तो सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र पाकिस्तानने ठोस पाऊल उचलले नाही, असे राजनाथ सिंह यांनी नमूद केले. अलिकडे पाकिस्तानने सर क्रीकजवळ सैनिकी पायाभूत सुविधा उभारण्यास सुरुवात केली असून त्याकडे भारताने गंभीर दृष्टीने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

ऑपरेशन सिंदूरचा संदर्भ

आपल्या भाषणात त्यांनी ऑपरेशन 'सिंदूर'चाही उल्लेख केला. या मोहिमेत पाकिस्तानने लेहमधून सर क्रीकपर्यंत भारताच्या संरक्षण व्यवस्थेला आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र भारतीय सैन्याने प्रभावी प्रत्युत्तर देत पाकिस्तानी एअर डिफेन्स सिस्टम हाणून पाडला. या कारवाईने भारत आपली सीमा व सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यास नेहमी सज्ज असल्याचा संदेश जगाला दिले आहे.

राजनाथ सिंह यांच्या या इशारामुळे सर क्रीक विवाद पुन्हा एकदा चांगलाच तापला आहे. पाकिस्तानकडून सातत्याने होत असलेल्या हालचालीमुळे भारताची सावधानता वाढली असून सीमावर्ती भागात लष्करी ताकद सज्ज आहे.

SCROLL FOR NEXT