Ashok Gehlot - uddhav Thackeray
Ashok Gehlot - uddhav Thackeray  Sarkarnama
देश

कौतुकास्पद! महाराष्ट्रचे मॉडेल राजस्थानने स्वीकारले, अधिकाऱ्यांनी केली पाहणी

सरकारनामा ब्युरो

मुंबई : महाराष्ट्रासाठी एक कौतुकास्पद बातमी आहे. राज्य सरकारचे ई-पीक पाहणी (E-Peek Pahani) अहवाल मॉडेल आता राजस्थान सरकारने स्विकारले आहे. राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी याबाबत माहिती दिली. यानंतर मंत्री थोरात यांनी ट्विट करुन राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि महसूल मंत्री रामलाल जाट यांचे आभारही मानले आहेत.

मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाचा पथदर्शी ई-पीक पाहणी प्रकल्प राजस्थान सरकारने स्वीकारला आहे. राजस्थान सरकारच्या उच्चस्तरीय अधिकारी पथकाने महाराष्ट्रात येऊन या प्रकल्पाचे बारकावे समजून घेतले. ‘ई गिरदावरी’ या राजस्थानच्या प्रकल्पात सुधारणा करून आता पिकांची नोंद थेट शेतकऱ्यांकडून केली जाणार आहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि महसुलमंत्री रामलाल जाट (Ramlal Jat) यांच्या नेतृत्वाखाली राजस्थानच्या महसूल विभागात आधुनिक पर्वाला सुरुवात होते आहे, त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. महाराष्ट्राच्या वतीने त्यांना मदत करताना आम्हाला आनंद होतो आहे. ई पीक पाहणी प्रकल्पाचे आजवरचे यश बघता महाराष्ट्राचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प देशभर स्विकारला जाईल याची मला खात्री असल्याचेही थोरात यांनी सांगितले.

तसेच ते पुढे म्हणाले, महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनी या प्रकल्पाला भरभरून प्रतिसाद दिला, त्याचे हे यश आहे असे मी समजतो. महाविकास आघाडी सरकारचा महसूल विभाग लोकाभिमुख आणि पारदर्शक सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे, तो भविष्यातही देशाला दिशादर्शक ठरेल असा विश्वासही मंत्री थोरात यांनी व्यक्त केला.

राज्यात दोन-तीन गावांमध्ये मिळून एकच तलाठी असल्याने पीक पाहणी अचूक नोंदवली जात नाही, असा शेतकऱ्यांचा सातत्याने आक्षेप होता. मात्र हिच बाब लक्षात घेवून महसूल विभागाने पिकाची रिअल टाइम नोंदणी करण्याची सुविधा थेट शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे. महसूल विभागाने यासाठी स्वतंत्र मोबाइल अॅप्लिकेशन निर्मिती केली असून ई-पीक पाहणी हा प्रकल्प १५ ऑगस्टपासून राज्यभर राबवण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT