Parliament Winter Session : संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्यसभेत शुक्रवारी मोदी सरकारवर नामुष्की ओढवली. राज्यसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर सभापती सी. पी. राधाकृष्णन आपल्या आसनावर विराजमान झाले. त्यानंतर विरोधी बाकांवरील सदस्यांनी सभागृहात एकही कॅबिनेट मंत्री उपस्थित नसल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर सभागृहात जोरदार गदारोळ झाला. त्यामुळे सभापतींनी मोठा निर्णय घ्यावा लागला.
राज्यसभेत सकाळी ११ वाजता सभापती राधाकृष्णन दाखल झाल्यानंतर सुरूवातीली संसदेवरील अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर सभापतींनी कामकाजाला सुरूवात केली. मात्र, एकही कॅबिनेट मंत्री उपस्थित नसल्याचा प्रकार विरोधकांनी सभापती राधाकृष्णन यांच्या लक्षात आणून दिला. राधाकृष्णन यांनी सत्ताधारी बाकांकडे पाहिल्यानंतर त्यांच्याही लक्षात ही बाब आली.
विरोधी पक्षातील खासदारांनी हा मुद्दा जोरकसपणे मांडल्यानंतर राधाकृष्णन यांनी याबाबत सरकारकडे विचारणा करू, असे सांगत त्यांनी सभागृहातील राज्यमंत्र्यांकडे कॅबिनेट मंत्र्यांना उपस्थित राहण्याची विनंती करण्याबाबतची सूचना केली. मला प्रक्रिया माहिती आहे. मी मंत्र्यांना विनंती केली आहे. एकतरी कॅबिनेट मंत्री उपस्थित असायला हवे, असे राधाकृष्णन यांनी विरोधकांकडे पाहत सांगितले.
सभापतींच्या या भूमिकेवर विरोधी पक्षातील खासदार समाधानी झाले नाहीत. त्यांनी मंत्री येईपर्यंत सभागृहाचे कामकाज तहकूब करण्याचा आग्रह धरला. काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले, हा सभागृहाचा अपमान आहे. कॅबिनेट मंत्री उपस्थित राहत नाहीत, तोपर्यंत सभागृहाचे कामकाज थांबवा, अशी मागणी रमेश यांनी केली.
मंत्री येण्याची पाच मिनिटे वाट पाहिल्यानंतरही कोणीच न फिरकल्याने राधाकृष्णन यांनी दहा मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले. सकाळी ११.१५ वाजता पुन्हा कामकाज सुरू झाल्यानंतर संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सभागृहात कॅबिनेट मंत्र्यांच्या अनुपस्थितीबद्दल दिलगिरी व्यक्त केली. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांना लोकसभेत श्रध्दांजली वाहण्यात आली, त्यासाठी मी तिथे होतो, असे रिजिजूंनी सांगितले.
केंद्रीय आरोग्य मंत्री व सभागृह नेते जे. पी. नड्डा यांनीही दिलगिरी व्यक्त केली. लोकसभेत आपल्या विभागाशी संबंधित प्रश्न असल्याने आपण राज्यसभेत उपस्थित नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेस नेते प्रमोद चौधरी यांनी शिवराज पाटील हे या सभागृहाचेही सदस्य होते, ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यावर रिजिजू यांनी या सभागृहातही श्रध्दांजली अर्पण केली जाईल, असे सांगितले. त्यानंतर सभागृहाचे कामकाज सुरू झाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.