Medha Kulkarni, Suresh Kalmadi Sarkarnama
देश

Medha Kulkarni Vs Suresh Kalmadi : ...त्यांनी बट्याबोळ केला! राज्यसभेत मेधा कुलकर्णींचा कलमाडींवर घणाघात

Rajya Sabha Session Pune Union Budget : खासदार मेधा कुलकर्णी यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर बोलताना सुरेश कलमाडी यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.  

Rajanand More

New Delhi : केंद्रीय अर्थसंकल्पावर बोलताना राज्यसभेत खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुण्याच्या वाहतुकीवर भाष्य केले. यादरम्यान त्यांनी पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्यावर टीकास्त्र सोडले. त्यांनी पुण्याच्या वाहतुकीचा बट्याबोळ केला, पुणेकरांची फसवणूक केली, असा निशाना कुलकर्णी यांनी साधला.

अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काहीच मिळाले नाही, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. या आरोपांना कुलकर्णी यांनी राज्यसभेत मराठीतून भाषण करत सडेतोड उत्तर दिले. यादरम्यान पुण्याविषयी बोलताना त्यांनी माजी खासदार कलमाडींचे यांचे नाव घेतले नाही. मात्र, कॉमनवेल्थ यूथ गेम्सचा उल्लेख करत अचूक निशाणा साधला.

पुणे शहरामध्ये एक तत्कालीन खासदार होते, असे सांगत कुलकर्णी म्हणाल्या, त्या खासदारांचे नाव तुम्ही कॉमनवेल्थ युथ गेममध्ये ऐकले असेल. त्या खासदारांनी दरवेळी पुण्याला फसवले. दरवेळी आश्वासन दिले की, आम्ही मेट्रो आणू, मोनोरेल आणू. दरवेळी निधीची तरतूद करायची, आश्वासने द्यायची आणि नंतर तोंडाला पाने पुसायची. हे काम त्यांनी केले. त्यामुळे पुण्याच्या वाहतुकीचा पूर्णपणे बट्याबोळ झाला आहे.

केंद्रात मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर 2014 पासून हे निस्तरायला सुरूवात झाली. तेव्हापासून पुणे शहराचा चेहरा पुन्हा एकदा दाखवून देण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. पुण्यात मेट्रोचे जाळे सुरू होत आहे. त्यासाठी 814 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुळा-मुठा नदी संवर्धनासाठी 690 कोटींची तरतूद करण्यात आल्याचेही कुलकर्णी यांनी आपल्या भाषणादरम्यान सांगितले.

कुलकर्णी यांनी महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आल्याचेही सांगितले. मुंबई, नागपूर मेट्रोला दिलेला निधी, कोकणात वाढवण बंदरासाठी दिलेले 76 हजार कोटी, त्यामुळे निर्माण होणारा रोजगार रस्ते प्रकल्पांसाठी देण्यात आलेल्या निधीचाही कुलकर्णी यांनी उल्लेख केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT