Shivakumar Government Crisis News : जलसंपदा खाते मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त करत मंत्रिपदाचा राजीनामा दिलेले रामलिंगा रेड्डी यांनी काँग्रेस हायकमांडच्या हस्तक्षेपानंतर आणि समेटाच्या प्रयत्नानंतर आपला राजीनामा मागे घेतला आहे. खातेवाटपाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारमध्ये निर्माण झालेला गोंधळ आणि मतभेद आता निवळल्याचे दिसत आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते रणदीपसिंग सुरजेवाला यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना रेड्डी म्हणाले, ‘मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांनी तो स्वीकारण्यास नकार दिला आहे. राजीनामा स्वीकारला जाणार नाही, म्हणजे तो फेटाळण्यात आला असेच समजावे.’
या आधी रेड्डी राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम होते. तर शिवकुमार आणि सुरजेवाला यांच्या निर्णयाची प्रतीक्षा करत असल्याचे त्यांनी म्हटले होते. माझे मत यापूर्वीच स्पष्ट केले आहे. शुक्रवारी (ता. ५) रात्री मुख्यमंत्री शिवकुमार आणि सुरजेवाला यांची भेट घेतली. तर ‘मी संयम सोडलेला नाही’ आपण संयम गमावला आहे का, असा प्रश्न विचारल्यावर रेड्डी म्हणाले, ‘मी अजूनही संयम सोडलेला नाही. संयम गमावला असता तर तुमच्याशी इतक्या शांतपणे बोलत बसलो नसतो.’
दरम्यान विधानसौध येथे माजी मुख्यमंत्री देवराज अरस यांच्या पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना शिवकुमार यांनी, रेड्डी यांनी व्हॉटस् ॲपद्वारे राजीनामा पाठविल्याचे खरे आहे. मात्र, आता तो विषय पूर्णपणे निकाली निघाला असून, त्यावर अनावश्यक तर्क-वितर्क लावू नयेत, असे म्हणाले.
राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकांबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, काँग्रेसने राज्यसभेसाठी तीन आणि विधान परिषदेसाठी पाच उमेदवार मैदानात उतरवले आहेत. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी राजसभेसाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेडा तसेच एआयसीसीचे सचिव व युवा नेते मन्सूर अली खान यांनाही उमेदवारी दिली आहे.
विधान परिषदेच्या सर्व पाच जागांसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनाच संधी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकमध्ये नेतृत्वबदलाबाबत केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शिवकुमार म्हणाले की, पंतप्रधानांनी आपल्याला शुभेच्छा दिल्या असून त्याबद्दल त्यांचा आभारी आहे. लवकरच त्यांची भेट घेणार असून राज्याच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रितपणे काम करावे, असेही त्यांनी नमूद केले.
पहिले मोठे आव्हान परतवले दरम्यान, बंगळूर शहर विकास खाते न मिळाल्याने नाराज झालेल्या रेड्डी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली होती. मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर शिवकुमार यांच्यासमोर उभे राहिलेले हे पहिले मोठे राजकीय आव्हान मानले जात होते. मात्र, आता हा वाद मिटल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.