Sonia Gandhi
Sonia Gandhi  sarkarnama
देश

केंद्रीय मंत्री म्हणाले, हॅरिस उपराष्ट्रपती झाल्या, मग सोनिया गांधी पंतप्रधान का होऊ शकत नाहीत

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली : सोनिया गांधी यांच्या परदेशी असण्याच्या मुद्द्याला निरर्थक ठरवत केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी त्यांच्याबाबत मोठे विधान केले. जर भारतीय वंशाच्या कमला हॅरिस (Kamala Harris) अमेरिकेच्या उपराष्ट्रपती होऊ शकल्या तर काँग्रेस प्रमुख सोनिया गांधी २००४ च्या निवडणुकांनंतर पंतप्रधानही बनू शकल्या असत्या, असे आठवले यांनी शनिवारी म्हटले.

आठवले यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर असताना त्यांनी कमला हॅरिस यांच्यासोबत बैठक घेतली. त्यानंतर आठवले यांनी हे विधान केले आहे. सोनिया गांधींनी २००४ मध्ये पंतप्रधान व्हायला हवे होते. जर त्या हे पद स्वीकारणार नव्हत्या, तर काँग्रेसला बळकटी देण्यासाठी शरद पवार यांना पंतप्रधान बनवायला हवे होते, असे आठवले यांनी म्हटले.

जेव्हा यूपीएला २००४ च्या निवडणुकीत बहुमत मिळाले, तेव्हा मी सोनिया गांधी यांना पंतप्रधान व्हावे असा प्रस्ताव दिला होता. माझ्या मते त्यांच्या परदेशी असण्याच्या मुद्द्याला काही अर्थ नव्हता असे आठवले म्हणाले. जर कमला हॅरिस अमेरिकेच्या उपराष्ट्रपती बनू शकतात, तर मग सोनिया गांधी, भारताच्या नागरिक माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पत्नी आणि लोकसभेत खासदार म्हणून निवडून आलेल्या, पंतप्रधान का होऊ शकत नाहीत असा सवाल आठवले यांनी केला.

पंतप्रधानपदासाठी पवार हे जननेते म्हणून पात्र होते. काँग्रेसने पवार यांना मनमोहन सिंग यांच्या जागी पंतप्रधान बनवायला हवे होते. मात्र, सोनिया गांधींनी तसे केले नाही. शरद पवार जर २००४ मध्ये देशाचे पंतप्रधान झाले असते, तर काँग्रेसला आजच्या परिस्थितीला सामोरे जावे लागले नसते.

दरम्यान, पंजाबच्या मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होण्यास भाग पाडलेले ज्येष्ठ नेते अमरिंदर सिंग यांचा काँग्रेसने केलेला अपमान लक्षात घेता त्यांनी भाजप किंवा त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील होण्याची विनंती आठवले यांनी केली. सिंग भाजपमध्ये सामील झाल्यास पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपची स्थिती मजबूत होईल, असेही आठवले यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT