Ravneet Singh Bittu Sarkarnama
देश

Ravneet Singh Bittu : पंजाबमध्ये काँग्रेसला धक्का! राहुल गांधींचे निकटवर्तीय रवनीत सिंग बिट्टू भाजपमध्ये दाखल

Punjab BJP and Congress News : पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंह यांचे नातू असून तिसऱ्यांदा खासदार झाले आहेत.

Mayur Ratnaparkhe

Punjab BJP News : लोकसभा निवडणुकीच्या अगोदर देशभरात राजकीय उलथापालथ सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न सुरू आहेत. तर इच्छुक उमेदवारांकडून तिकीट मिळावे यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. याशिवाय, अनेक ठिकाणी विरोधी पक्षातील तगड्या नेत्यांना, खासदारांना गळाला लावण्याचेही का्म केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये काँग्रेसचा बडा नेता भाजपच्या गळाला लागला आहे.

पंजाबमध्ये काँग्रेसला लोकसभा निवडणुकीअगोदर मोठा झटका बसला आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंह यांचे नातू रवनीत सिंह बिट्टू यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे ते माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे निकटवर्तीय आणि लुधियना मतदारसंघातील विद्यमान खासदार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे यांनी रवनीत सिंह बिट्टू यांना भाजपचे सदस्यत्व देत, त्यांचे पक्षात स्वागत केले. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर बिट्टू म्हणाले, जेव्हा जेव्हा मी पंजाबचा मुद्दा उचलला तेव्हा पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी सकारात्मकता दर्शवली. आम्ही पंजाबला पुढे घेऊन जाऊ इच्छितो. जेव्हा देश पुढे जात आहे, तर पंजाबने मागे का रहावे? याप्रसंगी त्यांनी पंजाबमधील गुरदासपुरचे भाजपचे खासदार सनी देओलवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आणि म्हणाले की, काही जणांमुळे पक्षाचे नुकसान झाले आहे.

रवनीत बिट्टू यांची गणना पंजाबमधील काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांमध्ये होते. ते तिसऱ्यांदा खासदार झाले आहेत. सर्वप्रथम 2009मध्ये आनंदपुर साहिब मतदारसंघातून विजयी झाले. त्यानंतर 2014 आणि 2019मध्येही विजयी झाले.

दरम्यान भाजपने मंगळवारी पंजाबमध्ये स्वबळावरच लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली. यामुळे आता भाजप आणि शिरोमणी अकाली दल यांच्यातील युतीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. भाजपने स्वबळाचा नारा दिल्याने आता पंजाबमध्ये लोकसभा निवडणुकीत चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. पंजाबमध्ये लोकसभेच्या 13 जागांसाठी 1 जून रोजी मतदान पार पडणार आहे. जे लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यांपैकी अंतिम टप्प्यात होणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT