RBI Big Update 2026 : देशभरातील नागरिकांसाठी आर्थिक व्यवहारांशी संबंधित एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रिझर्व्ह बँकेने 2005 सालापूर्वी छापण्यात आलेल्या महात्मा गांधी मालिकेतील जुन्या चलनी नोटा टप्प्याटप्प्याने चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे देशातील बँकिंग क्षेत्रात मोठी हालचाल सुरू झाली असून आर्थिक वर्तुळात याची चर्चा 'छुप्या नोटबंदी'च्या रूपात सुरू झाली आहे.
RBIने 9 जून 2026 रोजी देशातील सर्व बँकांना जारी केलेल्या परिपत्रकात स्पष्ट केले आहे की, 1 जुलै 2026 पासून 2005 पूर्वीच्या नोटा स्वीकारणे किंवा बदलून देण्याची सुविधा सामान्य बँकांमध्ये बंद करण्यात येणार आहे. यानंतर या जुन्या नोटा बदलण्याची सुविधा केवळ RBI च्या देशभरातील 19 प्रादेशिक कार्यालयांमध्येच उपलब्ध असेल.
RBI च्या आदेशानंतर देशातील विविध बँकांनी (Bank) तातडीने अंमलबजावणी सुरू केली आहे. बँक ऑफ महाराष्ट्राने 12 जून 2026 रोजी पुणे येथील मुख्य कार्यालयातून अंतर्गत परिपत्रक जारी करत सर्व शाखा, क्षेत्रीय कार्यालये आणि चलन पेढ्यांना 2005 पूर्वीच्या नोटांबाबत कठोर निर्देश दिले आहेत.
या निर्देशांनुसार, कोणत्याही परिस्थितीत 2005 पूर्वी छापलेल्या जुन्या नोटा ग्राहकांना एटीएम किंवा बँकेच्या काउंटरवरून पुन्हा व्यवहारासाठी देऊ नयेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे आर्थिक क्षेत्रात हा निर्णय म्हणजे टप्प्याटप्प्याने राबवली जाणारी आणखी एक अप्रत्यक्ष नोटबंदी असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
RBIने या निर्णयामागे आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानकांचे पालन आणि चलनी नोटांमधील सुरक्षा वैशिष्ट्ये अधिक आधुनिक करण्याची गरज असल्याचे कारण दिले आहे. जुन्या नोटांमधील सुरक्षा वैशिष्ट्ये कालबाह्य होत असल्याने त्या टप्प्याटप्प्याने चलनातून काढल्या जात आहेत.
विशेष म्हणजे, भारतात 1996 साली प्रथमच सर्व मूल्यांच्या नोटांवर महात्मा गांधी यांचे चित्र असलेली “महात्मा गांधी मालिका” सुरू करण्यात आली होती. त्यानंतर 2016 मधील नोटबंदीनंतर केंद्र सरकार आणि RBI ने नवीन डिझाइन, नवीन रंग आणि वेगळ्या आकारातील 'महात्मा गांधी न्यू सीरीज' बाजारात आणली.
सामान्य नागरिकांना जुन्या आणि नव्या नोटांमधील फरक सहज ओळखता यावा यासाठी RBI ने एक महत्त्वाची माहिती दिली आहे. 2005 नंतर छापलेल्या सर्व नोटांच्या मागील बाजूस खालच्या भागात छपाईचे वर्ष स्पष्टपणे नमूद केलेले असते. RBIच्या या निर्णयामुळे लाखो नागरिकांकडे असलेल्या जुन्या नोटांबाबत आता संभ्रम निर्माण झाला असून, येत्या काही दिवसांत या विषयावर देशभरात मोठी चर्चा होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.