RBI News
RBI News Sarkarnama
देश

RBI Restrictions : ‘या’ बॅंकांतून खातेदारांना पाच हजारांपर्यंत रक्कम काढता येणार, तीन बॅंकांतून पैसेच काढता येणार नाहीत : राज्यातील दोन बॅंकांचा समावेश

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर : आर्थिक घडी विस्कटलेल्या देशातील पाच बॅंकांवर रिझर्व्ह बॅंकेने (RBI) मोठी कारवाई केली आहे. या बॅंकांमधून (Bank) ग्राहकांना आता पाच हजार रुपयांपेक्षा जादा रक्कम काढता येणार नाही. पुढील सहा महिने हे निर्बंध राहणार आहेत. या बॅंकांमध्ये सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील अकलूज येथील शंकरराव मोहिते पाटील (Mohite-Patil) सहकारी बॅंकेचा समावेश आहे. या बॅंकेच्या संपूर्ण जिल्ह्यात शाखा आहेत. त्यामुळे या बॅंकांच्या ग्राहकांना यापुढे आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागू शकते. (RBI strict restrictions on five banks including Shankarao Mohite-Patil Bank)

या पाच बॅंकांमध्ये एचसीबीएल सहकारी बँक, लखनौ (उत्तर प्रदेश), आदर्श महिला नागरी सहकारी बँक मर्यादित, औरंगाबाद (महाराष्ट्र) आणि शिमशा सहकार बँक नियमित, मद्दूर, मांड्या (कर्नाटक) या बॅंकांचे ग्राहक आपल्या खात्यातून पैसे काढू शकणार नाहीत. तर, उर्वाकोंडा सहकारी नगर बँक, उर्वाकोंडा (अनंतपूर जिल्हा, आंध्र प्रदेश) आणि शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक, अकलूज (महाराष्ट्र) या बँकांमधील ग्राहकांना केवळ ५ हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे.

या पाच बॅंकांवर २४ फेब्रुवारीपासून पुढील सहा महिन्यांसाठी हे निर्बंध असणार आहेत. मात्र, या बँकांचे पात्र ठेवीदार विमा आणि क्रेडिट हमी नियमाप्रमाणे पाच लाख रुपयांपर्यंतची जमा विमा दावा रक्कम मिळविण्यास पात्र असतील. आरबीआयने या बँकेच्या खर्चावरही नियंत्रण आणण्याच्या सूचना केल्या आहेत.

येत्या ४५ दिवसांमध्ये बँकेला डीआयसीजीसीकडे (डिपॉझिट इन्शुरन्स ॲण्ड क्रेडिट गॅरंटी कार्पोरेशन) ठेवीदारांची यादी सादर करावी लागणार आहे. शंकरराव मोहिते-पाटील सहकारी बँकेच्या एकूण ९ शाखा व १ मुख्यालय अशी कार्यालये आहेत. ६ हजार ४८० एवढे बँकेचे सभासद आहेत. बँकेकडे ६९ कोटी रुपयांच्या ठेवी असून बँकेने ४० कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे.

बँकेच्या ठेवीदारांनी व खातेदारांनी घाबरून जाऊ नये. अफवांवर विश्‍वास ठेवू नये. आरबीआयने दिलेल्या सूचनांनुसार या बँकेला सुस्थितीत आणण्यासाठी सहकार विभागाच्या वतीने प्रयत्न केले जातील. आरबीआयने दिलेल्या निर्देशांचे पालन करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. माळशिरस येथील सहायक निबंधकांनी शनिवारी (ता. २५) सकाळी बँकेच्या अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची बैठक घेतली आहे, असे जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT