Kolkata : पश्चिम बंगालमधील उद्रेक कमी होण्याचे नाव घेत नाही. ट्रेनी डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात दररोज आंदोलनाचा भडका उडत आहे. मंगळवारी विद्यार्थी संघटनांनी केलेल्या आंदोलनादरम्यान हिंसा झाली. त्यानंतर भाजपने बुधवारी (28 ऑगस्ट) राज्यव्यापी बंदची घोषणा केली आहे.
बदलापूर येथील एका शाळेतील अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेविरोधात महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडून शनिवारी (24 ऑगस्ट) बंद घोषित करण्यात आला होता. त्याविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना कोर्टाने हा बंद बेकायदेशीर ठरवला होता.
बंगालमध्ये भाजपने बुधवारी सकाळी 6 ते सायंकाळी 6 असा 12 तासांचा राज्यव्यापी बंद पुकारला आहे. मंगळवारी पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या कारवाईविरोधात हा बंद असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे. पण आता महाराष्ट्रातील बंदला कोर्टाने मान्यता दिली नव्हती. बंगालमधील कोर्ट भाजपच्या बंदला मान्यता देणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मात्र भाजपच्या बंदला मान्यता मिळणार नाही, असे स्पष्ट केले आहे. तसेच या बंदमध्ये कुणीही सहभागी होऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. बंदमुळे जनजीवन विस्कळीत होणार नाही, याची खबरदारी प्रशासनाकडून घेतली जाईल, असे सरकारने म्हटले आहे.
ममतांचे मुख्य सल्लागार अलपन बंदोपाध्याय यांनी सांगितले की, ‘सरकार बुधवारी कोणत्याही बंदला परवानगी देणार नाही. लोकांनी यामध्ये सहभागी होऊ नये, असे आवाहन आम्ही करत आहोत.’ राज्य सरकारने एक अधिसुचनाही जारी केली असून सरकारी कर्मचाऱ्यांनी बंदमध्ये सहभागी होऊ नये, असे ठणकावले आहे. बंगाल ज्युनियर डॉक्टर्स फोरमनेही बुधवारी कोलकातामध्ये रॅली काढण्याची घोषणा केली आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीच बंगाल बंदचे समर्थन केले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांता मुजूमदार यांच्या बंदच्या घोषणेनंतर त्यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, ‘कोलकाता यथील पोलिस मनमानी करत आहेत. दीदींच्या बंगालमध्ये बलात्कारी आणि आरोपींची मदत करणे मौल्यवान आहे, पण महिला सुरक्षेवर बोलणे गुन्हा ठरतो.’
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.