Lalu Prasad Yadav Sarkarnama
देश

लालूंची प्रकृती चिंताजनक; रांचीतून तातडीनं दिल्लीला 'एम्स'मध्ये हलवलं

चारा गैरव्यवहार प्रकरणी लालूप्रसाद यादव यांना न्यायालयाने नुकतीच शिक्षा सुनावली आहे.

सरकारनामा ब्युरो

रांची : बिहारचे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांची तब्येत पुन्हा बिघडली असून, त्यांना तातडीने अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (AIIMS) दाखल करण्यात आले आहे. लालूंना पशुखाद्य गैरव्यवहार प्रकरणात (fodder scam) पाच वर्षे कारावास आणि 60 लाख रूपयांच्या दंडाची शिक्षा न्यायालयाने नुकतीच सुनावली आहे. त्यांच्या जामिनावर अद्याप निर्णय झालेला नाही.

लालूंची तब्येत आज दुपारी अचानक बिघडली. त्यामुळे त्यांना तातडीने रांचीतील रुग्णालयातून दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले. त्यांना हृदयविकार आणि मूत्रपिंडविकाराचा त्रास होत आहे. त्यांना उपचारासाठी दिल्लीतील एम्समध्ये हलवण्याचा निर्णय कारागृह प्रशासनाने घेतला. याआधीही लालूंना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली.

मागील वर्षी डॉक्टरांनी लालूंच्या प्रकृतीचा अहवाल सादर करण्यात केला होता. या अहवालानुसार, लालूंना मागील 20 वर्षांपासून मधुमेह आहे. हा आजार दिवसेंदिवस बळावत आहे. त्यांचे अवयव अतिशय वेगाने खराब होत आहेत. यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक बनत आहे. लालूंची किडनी केवळ 25 टक्केच काम करीत आहे. त्यांची प्रकृती कोणत्याही क्षणी ढासळू शकते. किडनीची काम करण्याची क्षमता कधीही कमी होऊ शकते आणि ती नेमकी कधी कमी होईल, हे सांगता येणार नाही.

चारा गैरव्यवहार प्रकरणी लालूंच्या जामिनावरील सुनावणी झारखंड उच्च न्यायालयाने 11 मार्चला 1 एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे. अविभाजित बिहार राज्य (झारखंडसह) असताना लालूंनी विविध सरकारी कोशागारातून बेकायदा पैसे काढून 950 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहेत. या चारा गैरव्यवहार प्रकरणात काही खटले सुरू आहेत. यातील काही खटल्यांत लालूंना शिक्षाही झाली आहे. पाटणा उच्च न्यायालयाने मार्च 1996 मध्ये दिलेल्या आदेशानुसार केंद्रीय अन्वेषण विभागाने या प्रकरणी एफआयआर दाखल केला होता. यानंतर सीबीआयने जून 1997 मध्ये लालूंना या प्रकरणात आरोपी ठरवत आरोपपत्र दाखल केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT