Yogi Adityanath, Nitish Kumar Sarkarnama
देश

Yogi Adityanath : योगींच्या एका निर्णयामुळे ‘एनडीए’त वादाची ठिणगी; थेट मोदींचं नाव घेत JDU ने फटकारलं...

NDA BJP JDU Kanwar Yatra : यूपीतील कावड यात्रेच्या मार्गावर असलेल्या सर्व दुकानांवर मालकाच्या नावाची पाटी लावण्याचे आदेश योगी सरकारने दिले आहेत.

Rajanand More

Patna :  एनडीएमध्ये विविध मुद्द्यांवर वाद निर्माण होण्यास सुरूवात झाली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या एका निर्णयामुळे वाद निर्माण झाला आहे. यूपीतील प्रसिध्द कावड यात्रेच्या सर्व मार्गांवरील सर्व दुकानांवर नावाची पाटी लावण्याचे आदेश योगी सरकारने दिले आहेत. त्यावरून वादाची ठिणगी पडली आहे.

कावड यात्रेच्या मार्गातील प्रत्येक दुकानावर मालकाच्या नावाची पाटी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यावरून वाद निर्माण झाला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलासह, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल असा सर्वच पक्षांनी त्यावर टीका केली आहे.

यात्रा यावर्षी 22 जुलैपासून सुरू होणार आहे. त्यासाठी यूपी आणि उत्तराखंडमध्ये मोठी तयारी केली जात आहे. यात्रेतील भक्तांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत, यासाठी योगी सरकारने मार्गातील दुकानांवर पाटी लावण्याचे आदेश दिल्याचे सरकारचे म्हणणे आहे. मात्र, हा निर्णय केवळ मुस्लिम दुकानांची ओळख पटावी, यासाठी घेण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

संयुक्त जनता दलाने या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. पक्षाचे नेते के. सी. त्यागी यांनी म्हटले आहे की, यूपीपेक्षा बिहारमध्ये कावड यात्रा मोठी असते. पण असे आदेश दिलेले नाही. हे आदेश म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या नाऱ्याचे उल्लंघन आहे. बिहार, राजस्थान, झारखंडमध्ये असा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे हा निर्णय बदलावा, अशी मागणी त्यागी यांनी केली आहे.

बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनीही विरोध केला आहे. निवडणुकीत फायदा व्हावा यासाठी घेण्यात आलेला हा निर्णय असंविधानिक आहे. एका विशिष्ट धर्मातील लोकांवर आर्थिक बहिष्कार टाकण्याचा हा प्रयत्न निंदनीय असल्याचे मायावतींनी म्हटले आहे.

दरम्यान, यूपीतील या निर्णयाचे राजकीय पडसाद इतर राज्यांमध्येही उमटू शकतात. बिहारमध्ये जेडीयूने या निर्णयाला विरोध केला आहे. या राज्यात पुढील वर्षी निवडणुका आहेत. त्यामुळे नितीश कुमार यांचे सरकार असा निर्णय घेणार नाही, हे स्पष्ट आहे. पण मित्रपक्ष असलेल्या भाजपकडून त्यासाठी दबाव टाकला जाऊ शकतो, अशीही चर्चा आहे. त्यामुळे या मुद्यामुळे एनडीएमध्ये वादाची ठिणगी पडल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT