किव्ह : युक्रेनवर (Ukraine) आक्रमण केल्यामुळे रशियाच्या (Russia) आर्थिक नाड्या आवळण्यात आल्या आहेत. रशियावर आंतरराष्ट्रीय निर्बंध लादण्यात आले आहेत. यामुळे रशियाची अर्थव्यवस्था अडचणीत आली आहेत. यानंतर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांनी थेट सौदी अरेबियाकडे मदतीसाठी जाण्याची खेळी खेळली आहे. सौदीच्या युवराजांशी फोनवरून पुतीन यांनी चर्चा केली आहे.
पश्चिमी देशांनी घातलेल्या निर्बंधांमुळे रशियाची अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. रशियाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात खनिज तेलावर अवलंबून आहे. आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे जागतिक पातळीवर रशियाला खनिज तेलाचा व्यापार करण्यात अडचणी येत आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर रशियाशी आर्थिक निर्बंध असल्याने या देशाशी व्यवहार करणे आता व्यापाऱ्यांना अशक्य बनले आहे. युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारल्यामुळे वाढलेला खर्चाचा बोजा आणि त्यातच आता झालेली आर्थिक कोंडी यातून मार्ग काढण्यासाठी पुतीन यांनी नवी खेळी खेळली आहे.
पुतीन यांनी सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांच्याशी फोनवरून चर्चा केली. तेल उत्पादक देशांची संघटना ओपेकचे नेतृत्व सौदी अरेबिया आणि रशिया करीत आहेत. तेलाचा व्यापार करणाऱ्या कंपन्या आता पुतीन यांच्यावर तेलाचे भाव कमी करण्यासाठीही दबाव टाकू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पुतीन आणि सलमान यांची चर्चा महत्वाची मानली जात आहे. जागतिक पातळीवरील तेल पुरवठ्यात कोणताही अडथळा सध्याच्या तणावामुळे येऊ नये, अशी भूमिका पुतीन यांनी सलमान यांच्यासमोर मांडली. रशिया आणि सौदी अरेबिया यांच्यातील भागीदारी आणखी वाढवण्यावरही दोघांमध्ये चर्चा झाली. यामुळे सौदी अरेबियाकडून रशियाला मदत मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे असले तरी यावर सौदी अरेबिया अंतिम निर्णय काय घेते, याकडे लक्ष लागले आहे.
युद्धात 350 नागरिकांचा मृत्यू
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यांत आतापर्यंत सुमारे 350 निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे, असा दावा युक्रेन सरकारने केला आहे. युक्रेनमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या खारकिव्हवर रशियाने हल्ले सुरु ठेवले आहेत. याचरोबर किव्ह शहरात रोजच रशियाकडून बाँबहल्ले सुरू आहेत. याचबरोबर क्षेपणास्त्र हल्लेही होत आहेत. युद्धाच्या भीतीने एकाच आठवड्यात युक्रेनमधील सुमारे दहा लाख नागरिकांनी स्थलांतर केले आहे. या स्थलांतरितांचा लोंढा शेजारील देशांमध्ये धडकत आहे. युक्रेनमधील स्थलांतर हे अत्यंत मोठ्या संख्येने झालेले या शतकातील हे सर्वांत वेगवान स्थलांतर असल्याचे संयुक्त राष्ट्रांनी (United Nations) म्हटले आहे. (Russia-Ukraine War Updates)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.