Vladimir Putin | Russia Ukraine War News Updates
Vladimir Putin | Russia Ukraine War News Updates Sarkarnama
देश

अण्वस्त्रांचा वापर कधी करणार? रशियानं थेट सांगितलं अन् जगाला दिला इशारा

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : रशियाने (Russia) युक्रेनवर हल्ला केल्यानंतर जगभरातून आण्विक युध्दाची भीती व्यक्त केली जात आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांनी काही दिवसांपूर्वीच आपली अण्वस्त्रे सज्ज ठेवण्याचा इशारा दिल्यानंतर आण्विक युद्धाच्या भीतीने त्याविषयी चर्चा सुरू झाली. त्यातच आता पुतीन यांच्या प्रवक्त्याने जगाची भीती वाढवली आहे. अण्वस्त्रांचा वापर करण्याबाबत त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

पुतीन यांचे प्रवक्ते दिमित्री पेसकोव यांनी ‘सीएनएन’शी बोलताना याचे संकेत दिले. ते म्हणाले, रशिया-युक्रेन युध्दात रशिया अण्वस्त्रांचा वापर करू शकते. पण आपल्या अस्तित्वाला धोका निर्माण झाल्याचे दिसल्यानंतरच हे पाऊल उचलले जाईल, असंही पेसकोव यांनी स्पष्ट केलं. पेसकोव यांचा हा इशारा अमेरिकेसह इतर देशांसाठी असल्याचे मानले जात आहे. अनेक देशांची विविध निर्बंध टाकत रशियाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याबाबत रशियाकडून उघडपणे नाराजीही व्यक्त करण्यात आली आहे. (Russia Ukraine War News Updates)

पेसकोव पुढे बोलताना म्हणाले की, देशाच्या सुरक्षेसाठी आम्ही सुसज्ज आहोत. हे सगळ्यांना माहिती आहे. आपल्या शेजारील देशांवर कब्जा करण्याचा आमचा हेतू नाही. रशियाकडून सामान्य नागरिकांवर हल्ला केला जात नाही. आमचं सैन्य केवळ लष्करी ठिकाणे आणि संबंधित भागालाच लक्ष्य करत आहे, असंही त्यांनी सांगितलं. (Russia Ukraine War)

पुतीन यांचं कुटुंब न्युक्लिअर बंकरमध्ये?

अणुयुध्दाचा धोका असल्यानं पुतीन यांनी आपले कुटुंब अण्वस्त्र हल्ल्यांचाही परिणाम होऊ न शकणाऱ्या न्युक्लिअर बंकरमध्ये पाठवल्याचा धक्कादायक खुलासा एका रशियन प्राध्यापकानं काही दिवसांपूर्वी केला होता. बंकरमध्ये एक अंडरग्राउंड शहरच असल्याचा दावा प्राध्यापकानं केला होता. या ठिकाणाबाबत अत्यंत गुप्तता पाळण्यात आली असून हे सायबेरीयातून एक ठिकाण असल्याचे प्राध्यापकाचे म्हणणे आहे. याबाबत डेली मेलने वृत्त दिले आहे. मॉस्को स्टेट इन्स्टिट्युट ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्सचे माजी प्राध्यापक व्हॅलेरी सोलोव्ही यांनी याबाबत माहिती दिली आहे.

डेली मेलच्या वृत्तानुसार, पुतिन यांना आण्विक युध्दाची भीती वाटत आहे. त्यामुळे कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. आधीपासूनच तयार अशलेल्या न्युक्लिअर बंकरमुध्ये कुटुंबीयांना पाठवले आहे. हे बंकर सायबेरियातील अल्ताई पर्वतरांगांमध्ये आहे. या बंकरवर अण्वस्त्रांचा कसलाही परिणाम होणार नाही, अशी त्याची रचना करण्यात आली आहे. आठवड्याच्या शेवटी पुतिन यांनी हे पाऊल उचलले आहे. खरंतर हे बंकर नसून अंटरग्राउंड शहरच आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पुरेपुर वापर करण्यात आल्याचा दावाही प्राध्यापकांनी केला होता. पण याबाबत अद्याप रशियाकडून खुलासा करण्यात आलेला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT