Uttar Pradesh BJP
Uttar Pradesh BJP  Sarkarnama
देश

भाजपचं जशास तसं उत्तर! विरोधकांचे 4 आमदार फोडून दिला मोठा धक्का

सरकारनामा ब्युरो

लखनौ : उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) पुढील वर्षाच्या सुरवातीला विधानसभा निवडणूक (Assembly Election) होत आहे. या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. अनेक पक्षांकडून इतर पक्षांचे आमदार फोडण्याचे सत्र सुरू झाले आहे. समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी भाजपसह (BJP) बहुजन समाज पक्षाचे (BSP) सात आमदार फोडले होते. आता भाजपने त्यांना जशास तसे उत्तर देत समाजवादी पक्षाचे 4 चार आमदार फोडले आहेत.

अखिलेश यादव यांनी आमदार फोडाफोडी सुरू केल्यानंतर भाजपने आता मोठा धक्का दिला आहे. विधान परिषदेवरील समाजवादी पक्षाच्या चार आमदारांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश मौर्य, भाजप प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेवसिंह यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. समाजवादी पक्षाच्या आमदार रमा निरंजन यांच्यासह चौघे आज भाजपमध्ये दाखल झाले. रमा निरंजन यांच्या पतीनेही भाजपमध्ये प्रवेश केला.

अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत 30 ऑक्टोबरला समाजवादी पक्षाच्या मुख्यालयात आमदारांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला. बसपचे 6 बंडखोर आमदार आणि भाजपच्या एका आमदाराने समाजवादी पक्षात प्रवेश केला होता. बसपच्या आमदारांमध्ये हरगोविंद भार्गव, हाजी मुज्तबा सिद्दीकी, हकीम लाल बिंदस अस्लम रैनी, सुषमा पटेल आणि अस्लम चौधरी यांचा समावेश होता. सीतापूरमधील भाजपचे आमदार राकेश राठोड यांनीही समाजवादी पक्षात प्रवेश केला होता. या आमदारांच्या प्रवेशामुळे अखिलेश यादव यांनी फोडाफोडीच्या राजकारणात आघाडी घेतली होती.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. यासाठी त्रिदेव हा नवा फॉर्म्युला यंदा भाजप वापरणार आहे. भाजपच्या समोर उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष, काँग्रेस व बहुजन समाज पक्षाचे प्रमुख आव्हान आहे. त्यांना तोंड देण्यासाठी भाजपने योगी आदित्यनाथ यांच्यासह ही त्रिदेव योजना अंमलात आणली आहे. नव्या त्रिदेव योजनेत पक्षाचे गावपातळीवरील लाखो कार्यकर्ते, बूथ प्रमुख व बूथ प्रभारी यांचा प्रत्यक्ष सहभाग असेल.

दुसऱ्या पक्षातील प्रभावी नेत्यांना भाजपमध्ये आणण्यावर भर देण्यात येणार आहे. गावागावांत व घरोघरी जाऊन राज्य व केंद्र सरकारची कामे, कोरोना व्यवस्थापन, शेतकऱयांसाठीच्या योजना समजावून सांगणे ही जबाबदारी बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांवर असेल. याचबरोबर जास्तीत जास्त तरूणांची मतदार म्हणून नोंदणी करून त्यांना पक्षाकडे वळवणे, हा उद्देश असणार आहे. दिवाळीनंतर राज्यात विशेष मतदार मेळावे होणार आहेत. हे मेळावे 7, 13, 21 व 28 नोव्हेंबरला घेतले जाणार आहेत. मतदार वाढवण्यासाठी कार्यशाळाही प्रत्येक जिल्ह्यात घेण्यात येतील. त्रिदेवच्या अंमलबजावणीवर भाजप नेतृत्वाचे थेट दिल्लीतून लक्ष रहाणार आहे. भाजपमध्येही सध्या देशपातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जे पी नड्डा असे त्रिदेव नेतृत्वच आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT