Akhilesh Yadav, Shivpal Yadav Sarkarnama
देश

Akhilesh Yadav : पुतण्याने काकांना पुन्हा डावललं; अखिलेश यांनी खेळलं ब्राम्हण कार्ड

Rajanand More

Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी पुन्हा एकदा आपल्या काकांना हुलकावणी दिली आहे. मागील अनेक दिवसांपासून चर्चा असलेल्या विरोधी पक्षनेतेपदासाठी त्यांनी ब्राम्हण कार्ड खेळले आहे. या पदासाठी पक्षाचा ब्राम्हण चेहरा असलेले आमदार माता प्रसाद पांडे यांची निवड करण्यात आली आहे.

अखिलेश यादव हे खासदार झाल्याने त्यांनी आमदारकी राजीनामा दिला. ते विधानसभेचे विरोधी पक्षनेतेही होते. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याने हे पद रिक्त झाले होते. मागील काही दिवसांपासून या पदावर कुणाची वर्णी लागणार, याबाबत चर्चा होती. त्यांचे काका आमदार शिवपाल यादव यांना हा मान मिळू शकतो, असेही तर्कवितर्क लढवले जात होते.

अखिलेश यांनी अखेर काका शिवपाल यांना डावलून पांड्ये यांच्या गळात विरोधी पक्षनेतेपदाची माळ टाकली आहे. पांड्ये हे अखिलेश यांच्या सरकारमध्ये विधानसभा अध्यक्षही होते. तसेच ते सातवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. ते 81 वर्षांचे आहेत.

समाजवादी पक्षाच्या आमदारांची रविवारी सकाळी पक्ष कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत पांड्ये यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्याचप्रमाणे आमदार महबूब अली यांची चीफ व्हीप म्हणून निवड कऱण्यात आली असून कमाल अख्तर यांच्याकडे प्रतोद तर राजेश कुमार यांच्याकडे उप प्रतोद पद देण्यात आले आहे.    

पांड्ये हे इटवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहे. त्यांची निवड करत अखिलेश यांनी पीडीए म्हणजे मागास, दलित आणि आदिवासींप्रमाणे ब्राम्हण समाजालाही जवळ करण्याचा प्रयत्न केला आहे. लोकसभा निवडणुकीत ओबीसी आणि दलितांची व्होट बँक अखिलेश यांच्या बाजूने उभी राहिली. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदावर पीडीएतील नेत्यालाच संधी दिली जाऊ शकते, अशी चर्चा होती.

काही दिवसांत राज्यात दहा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. अखिलेश यांनी ब्राम्हण कार्ड खेळत विरोधकांनाही धक्का दिला आहे. पीडीएसोबत ब्राम्हण समाजाला सूचक संदेश देत अखिलेश यांनी भाजपचे टेन्शन वाढवल्याचे मानले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT