नवी दिल्ली : पंजाबमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने (AAP) इतिहास घडवला. एकूण ११७ पैकी तब्बल ९२ जागा जिंकत काँग्रेससह (Congress) सर्च पक्षांचा सुफडासाफ केला. 'आप'ला मिळालेल्या या घवघवीत यशाचं श्रेय डॉ. संदीप पाठक (Sandeep Pathak) यांनाही दिलं जात आहे. त्यांना पंजाबचं चाणक्यही म्हटलं जात असून त्याचं बक्षिस म्हणून आपनं त्यांना सोमवारीच राज्यसभेची (Rajya Sabha) उमेदवारीही जाहीर केली. त्यानंतर काही वेळातच त्यांच्यावर गुजरातची जबाबदारी सोपवण्यात आली.
पंजाबमधील (Punjab) विजयानंतर आपने आता इतर राज्यांवर लक्ष केंद्रित केलं आहे. त्यासाठी नऊ राज्यांमध्ये पक्षाचे संघटन मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामध्ये गुजरातसह (Gujrat) तेलंगणा, हिमाचल प्रदेश, आसाम, छत्तीसगड, केरळ आदी राज्यांचा समावेश आहे. गुजरात हे राजकीयदृष्ट्या खूप महत्वाचं राज्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या करिष्मामुळे राज्यात भाजपला (BJP) पराभूत करणं इतर पक्षांसाठी कठीण मानलं जातं. पण आता आपनं ही जबाबदारी पंजाबचे चाणक्य संदीप पाठक यांच्यावर सोपवली आहे.
पाठक यांना सोमवारी पंजाबमधून राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ते आयआयटीचे प्राध्यापक असून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचे निकटवर्ती मानले जातात. पाठक हे पंजाबमध्ये तीन वर्षांपासून काम करत होते. पक्ष संघटना बळकट करण्यासाठी त्यांचेही मोठे योगदान असल्याची चर्चा आहे. आता त्यांच्यावरच गुजरातचे प्रभारी करण्यात आले आहे.
गुजरातमध्ये काही महिन्यांपुर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपला अनपेक्षित यश मिळालं आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही पक्षाकडून जोरदार तयारीनिशी उतरण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पाठक यांच्या खांद्यावर ही मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान, आपने सोमवारी पंजाबमधून पाच जणांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामध्ये पाठक यांच्यासह क्रिकेटपटू हरभजनसिंग, दिल्लीचे आमदार राघव चढ्ढा यांचाही समावेश आहे.
मागील काही दिवसांपासून हरभजनसिंगच्या नावाची जोरदार चर्चा होती. त्यानुसार पाच नावांमध्ये त्याच्या नावाचाही समावेश करण्यात आला आहे. तर चढ्ढा हे पंजाबमधील आपचे सह प्रभारी होते. निवडणुकीदरम्यान त्यांनी मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्यांच्या मतदारसंघातच सुरू असलेला बेकायदेशीर वाळू उपसा तसेच भ्रष्टाचाराच्या मुद्यावर त्यांनी रान उठवलं होतं. त्याचा फटका चन्नी यांना बसल्याचे निवडणुकीत दिसून आले. पंजाबमध्ये केलेल्या कामगिरीचे बक्षिस चढ्ढा यांना मिळाल्याचे बोलले जात आहे. ते ३३ वर्षांचे आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.