Sanjay Singh  Sarkarnama
देश

Rajya Sabha News : 'आप'ला धक्का : संजय सिंह राज्यसभेतून संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित

सरकारनामा ब्यूरो

Sanjay Singh News : मणिपूरच्या मुद्द्यावरून सभागृहात विरोधकांच्या गदारोळात आम आदमी (AAP) पक्षाचे खासदार संजय सिंह यांना राज्यसभेच्या अध्यक्षांनी पावसाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित केले. अध्यक्षांच्या आदेशाकडे वारंवार कानाडोळा केल्याप्रकरणी संजय सिंह यांना निलंबित करण्यात आले आहे. यामुळे 'आप'ला मोठा धक्का बसला आहे.

केंद्र सरकारच्या अध्यादेशावरून भाजप आणि 'आप'मध्ये मतभेद आहेत. दिल्लीतील सरकारी अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याचा केंद्र सरकारचा अध्यादेश राज्यसभेत कधीही चर्चेला येऊ शकतो. अशा वेळी संजय सिंह यांचे निलंबन झाल्यामुळे आपचे मोठे नुकसान झाले आहे. या अध्यादेशाला विरोध करण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी इतर पक्षांशी चर्चा करत मदत मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. अशातच त्यांच्या पक्षाच्या खासदाराचे निलंबन झाले आहे. यामुळे आपची मोठी अडचण झाली आहे.

दरम्यान, 'इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स' (इंडिया) या विरोधी आघाडीच्या घटक पक्षांनी पावसाळी अधिवेशनामध्ये सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मणिपूरच्या मुद्द्यावर संसदेच्या दोन्ही सभागृहात चर्चा करण्याची मागणी केली. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांच्यासह अनेक विरोधी पक्षाच्या खासदारांनी मणिपूरच्या मुद्द्यावर नियम २६७ अन्वये चर्चा करण्याची मागणी केली.

खर्गे यांच्याशिवाय आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा, काँग्रेसचे (Congress) सय्यद नासिर हुसेन आणि अन्य काही विरोधी सदस्यांनी याच विषयावर कामकाज तहकूब करण्याची नोटिस दिली. या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामध्ये खासदार संजय सिंह यांचे निलंबन झाले. संजय सिंह यांच्या राज्यसभेतून निलंबनावर आपचे मंत्री सौरभ भारद्वाज म्हणाले, भाजपचा (BJP) मार्ग असता तर त्यांनी संजय सिंह यांना तुरुंगात टाकले असते. संसदेतील विरोधी पक्षाचा सर्वात बुलंद आवाज म्हणजे संजय सिंह आहेत. ते घोषणा देतात आणि संपूर्ण विरोधक एकत्र येतात. संजय सिंह हे विरोधकांच्या दृष्टीने अडचणीचे ठरणे साहजिकच असल्याचेही भारद्वाज म्हणाले.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT