Santosh Patil News, Santosh Patil Death Case News, K S Eshwarappa News, Santosh Patil suicide case news updates Sarkarnama
देश

संतोष पाटलांच्या आत्महत्येनंतर भाजपच्या अडचणी वाढल्या; कंत्राटदारांचा मुख्यमंत्र्यांना अल्टीमेटम

बेळगावी येथील हिंदू युवा वाहिनीचे राष्ट्रीय सचिव व ठेकेदार संतोष पाटील यांच्या आत्महत्येनंतर आता कर्नाटकातील इतर कंत्राटदार संतापले आहेत.

सरकारनामा ब्युरो

बेंगलुरू : बेळगावी येथील हिंदू युवा वाहिनीचे राष्ट्रीय सचिव व ठेकेदार संतोष पाटील (Santosh Patil) यांच्या आत्महत्येनंतर आता कर्नाटकातील (Karnataka) इतर कंत्राटदार संतापले आहेत. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना अल्टीमेटम दिला आहे. भ्रष्टाचाराला आवर न घातल्यास आमदार व मंत्र्यांचा भ्रष्टाचाराचा भांडाफोड करू, असा इशाराच त्यांनी दिला आहे. त्यामुळे भाजप सरकारची डोकेदुखी वाढली आहे.

संतोष पाटील यांच्या आत्महत्येप्रकरणी कर्नाटकचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री के. एस. ईश्वरप्पा (K. S. Eshwarappa) यांच्यासह अन्य दोघांवर आत्महत्येस प्रवृत्त झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटील यांच्या कुटुंबीयांनी मंत्र्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तर काँग्रेसने ईश्वरप्पा यांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचाही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. (Santosh Patil Death Case News)

ईश्वरप्पा यांनी संतोष पाटील यांना एका कामाच्या बिलाच्या मोबदल्यात 40 टक्के कमिशनची मागणी केल्याचा आरोप होत आहेराज्य कंत्राटदार असोसिएशनने राज्य सरकारला 15 दिवसांची मुदत दिली आहे. याबाबत माहिती देताना असोसिएशनचे अध्यक्ष डी. केमपन्ना म्हणाले, राज्यातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी 15 दिवसांत ठोस पावले उचलावती, असा अल्टीमेटम मुख्यमंत्र्यांना दिला आहे. अन्यथा आम्ही भ्रष्टाचारी मंत्री आणि आमदारांची नावे जाहीर करू. आरोग्य हा विभाग सर्वाधिक भ्रष्टाचारी आहे. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विबाग, पंचायत राज आदी विभाग आहेत. असोसिएशनने महिनाभराचे काम बंद आंदोलन आणि आंदोलनाचा इशारा दिला आहे. बेंगलुरूमध्ये 25 मे रोजी मोठी सभा घेतली जाणार आहे. आम्ही काम बंद आंदोलनही करणार असून अद्याप दिवस ठरलेला नाही, असंही केमपन्ना यांनी सांगितले.

दरम्यान, संतोष पाटील यांचे बंधू प्रशांत पाटील यांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर ईश्वरप्पा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईश्वरप्पा यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसनेही (Congress) आक्रमक पवित्रा घेतला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार व अन्य नेत्यांनी थेट राज्यपालांची भेट घेत ईश्वरप्पा यांना मंत्रिपदावरून हटवण्याची मागणी केली आहे. माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनीही त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. भाजप सरकारमधील 40 टक्के कारभारामुळे संतोष पाटील यांना आत्महत्या करावी लागल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

काय आहे प्रकरण?

संतोष पाटील यांनी ईश्वरप्पा यांची तक्रार पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडे केली होती. उडपी येथील एका हॉटेलमध्ये मंगळवारी त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. ही आत्महत्या असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मागील काही दिवसांपासून ते बेपत्ता होते. बेळगावी पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात होता. दरम्यानच्या काळात पाटील यांनी त्यांच्या मित्रांना मेसेज केला होता. ईश्वरप्पा हे आपल्या मृत्यूला कारणीभूत असतील, त्यांना शिक्षा झाली पाहिजे, असं पाटील यांनी म्हटलं होतं. आता त्यांची सुसाईट नोटही पोलिसांना सापडली आहे. तसेच नातेवाईकांनाही तक्रार केल्याने पोलिसांनी ईश्वरप्पा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

ईश्वरप्पा यांच्या सांगण्यावरून आपल्या गावातील रस्त्याच्या कामासाठी चार कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. पण त्यांनी खोटेपणा, भ्रष्टाचार, अनियमितता केली, असं पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे ईश्वरप्पा यांना आपले बील देण्याचे सुचना द्याव्यात, अशी विनंती पाटील यांनी मोदींना केली होती. केलेल्या कामाचे चार कोटी रुपयांचे बील काढण्यासाठी ईश्वरप्पा यांच्याकडून 40 टक्के कमिशन मागितले जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT