Covid-19
Covid-19 sarkarnama
देश

अभ्यासातून धक्कादायक माहिती: देशात कोरोनामुळे तब्बल ३१ लाख लोकांचा मृत्यू

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली : देशामध्ये कोरोनाने (Corona) मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. त्यामध्येच आता धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. देशात कोरोनामुळे अंदाजे ३१ लाख लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा सायन्स जर्नलने केला आहे. गुरुवारी सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार देशात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची (Covid 19 Death) संख्या वास्तविक संख्येपेक्षा सहा पट अधिक असू शकते. देशात आतापर्यंत ४ लाख ६३ हजार १७८ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

मागील वर्षी एप्रिल ते जून दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अंदाजे ७१ टक्के म्हणजेच तब्बल २७ लाख मृत्यू झाले, असे संशोधकांना आढळले आहे. या अभ्यासात असे म्हटले आहे की या कालावधीत, कोरोनामुळे मृत्यूदर दुप्पट झाला होता. आपण अधिकृत आकडेवारी पाहिली तर भारतात दर दहा लाख लोकांमागे ३४५ मृत्यू झाले, जे अमेरिकेतील कोरोना मृत्यू दराचा सातवा भाग आहे. देशातील कोरोना संसर्गामुळे झालेल्या मृत्यूचे अपूर्ण प्रमाणीकरण आणि या मृत्यूंमागील इतर आजारांची कारणे दिल्याने, खरा आकडा समोर आलेला नाही. सर्वाधिक मृत्यू हे ग्रामीण भागात झाले आहेत. त्यांची नोंद होऊ शकलेली नाही, असा दावाही अभ्यासात करण्यात आला आहे.

अभ्यासासाठी आकडेवारी कुठून घेतली?

अभ्यासासाठी, संशोधकांनी १० राज्यांमधील १. ४ लाख लोकांचे फोनवरून सर्वेक्षण केले आहे. दोन लाख सरकारी आरोग्य केंद्र आणि नागरिक नोंदणी प्रणालींमधून झालेल्या मृत्यूंचा डाटा गोळा केला आहे तसेच या अभ्यासासाठी संयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्या विभागाचा डाटाही घेण्यात आला आहे.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजीच्या वैज्ञानिक सल्लागार समितीचे प्रमुख डॉ. जयप्रकाश मुलीयल माध्यमांशी बोलताना म्हणाले माझ्या अंदाजानुसार, भारतात सुमारे २२ लाख मृत्यू झाले असते. मात्र केवळ हजारो मृत्यूंची नोंद होत आहे, ही लाजिरवाणी बाब आहे. माझ्या मते देशात कोरोनामुळे किमान ३० लाख मृत्यू झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT