Jignesh Mevani
Jignesh Mevani Sarkarnama
देश

मेवानींची अटक भाजपला महागात! सत्र न्यायालयानंच केली थेट उच्च न्यायालयाकडं तक्रार

सरकारनामा ब्युरो

गुवाहाटी : गुजरातमधील (Gujrat) काँग्रेसचे (Congress) आमदार जिग्नेश मेवानी (jignesh Mevani) यांच्या अटकेवरून मोठा गदारोळ सुरू आहे. या प्रकरणात आता आसाममधील भाजप (BJP) सरकार अडचणीत आलं आहे. मेवानी यांना जामीन मंजूर करताना त्यांच्या विरोधात खोटा गुन्हा दाखल केल्याचा ठपका सत्र न्यायालयानं ठेवला आहे. या प्रकरणी थेट उच्च न्यायालयाकडं तक्रार दाखल करण्याची भूमिका सत्र न्यायालयानं घेतली आहे. (Jignesh Mevani News Updates)

मेवानी यांना जामीन देताना सत्र न्यायालयानं राज्य सरकारलाच अडचणीत आणलं आहे. न्यायाधीस अपारेश चक्रवर्ती यांनी म्हटलं आहे की, मेवानी यांच्यावरील कारवाई पाहता आपण देशात एक नवीन फौजदारी न्यायव्यवस्था आणत आहोत, असं दिसत आहे. मेवानी यांच्या विरोधात दाखल एफआयआरपेक्षा संबंधित महिलेनं न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर दिलेला जबाब वेगळा आहे. महिलेचा जबाब पाहता हा खोटा गुन्हा तयार करण्यात आल्याचे दिसते. जिग्नेश मेवानी यांना दीर्घ काळ तुरूंगात ठेवण्यासाठी न्यायालय आणि कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर झालेला आहे.

अशा प्रकारच्या खोट्या एफआयआर दाखल करून पोलीस त्यांची विश्वासार्हता गमावत आहेत. आरोपींवर गोळीबार अथवा त्यांची हत्या करणे हे पोलिसांसाठी राज्यात नेहमीचे काम झाले आहे. यामुळे सत्र न्यायालयानेच या प्रकरणी उच्च न्यायालयाकडे तक्रार केली आहे. उच्च न्यायालयच आता आसाम पोलिसांना निर्देश देईल. यामुळे पोलिसांच्या कामात सुधारणा होईल. आरोपीला अटक करताना प्रत्येक पोलिसाला बॉडीकॅम आणि वाहनांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याच्या उपाययोजना करता येतील. अन्यथा हे राज्य पोलिसांचे राज्य बनेल आणि ते समाजाला परवडणारे नाही, असेही न्यायालयाने सांगितले.

भाजपने मला अडकवण्यासाठी महिलेचा वापर केल्याचा दावा मेवानी यांनी केला आहे. हा भाजप सरकारचा भ्याडपणा आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. आसाममध्ये भाजपची सत्ता आहे. दरम्यान, मेवानी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी आसाम पोलिसांनी अटक केली होती. या गुन्ह्यात न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर लगेचच आसाम पोलिसांनी त्यांना दुसऱ्या गुन्ह्यात अटक केली होती. महिला पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन केल्याप्रकरणी हा दुसरा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला होता. या प्रकरणी अखेर त्यांना जामीन मंजूर झाला आहे.

वडगावमधील पालनपूर सर्किट हाऊसमध्ये मेवानी यांना 21 एप्रिलला आसाम पोलिसांनी अटक केली होती. त्या रात्रीच त्यांना अहमदाबादमध्ये नेण्यात आले होते. तिथून रेल्वेने त्यांना आसाममध्ये गुवाहाटीला नेण्यात आले होते. आसाममधील कोक्राझार येथील स्थानिक भाजप (BJP) नेत्यानं मेवानी यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दिली होती. धार्मिक भावना दुखावना, धार्मिक तेढ निर्माण करणे, असे आरोप मेवानी यांच्यावर करण्यात आले होते. आसाममध्ये पोलिसांनी तक्रार दाखल केल्यानंतर 24 तासांतच मेवानी यांना अटक झाली होती. गुजरातची आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही कारवाई झाल्याचा दावा काँग्रेसनं केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT