Amit Malviya Sarkarnama
देश

Amit Malviya : RSS-BJP नेत्यांमध्येच संघर्ष; मालवीयांवर लैंगिक शोषणाचे आरोप, काँग्रेसकडून आगीत तेल

Rajanand More

New Delhi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्री आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचा पुतण्या प्रज्वल रेवण्णा सेक्स स्कँडलप्रकरणी सध्या तुरुंगात आहे. हे वादळ शांत होत नाही, तोच भाजपच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप करण्यात आल्याचे समोर आले आहे.

मालवीय यांच्यावर विरोधी पक्षातील कुठल्या नेत्याने हे आरोप केले नाहीत तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका स्वयंसेवकाकडून हे आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकरणाला आता राजकीय रंग चढू लागला आहे. काँग्रेसकडून या आरोपांनंतर मालवीय यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे.

काय आहे प्रकरण?

आरएसएसचे स्वयंसेवक शंतनू सिन्हा यांनी काही दिवसांपुर्वी अमित मालवीय यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. त्यामुळे भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. मालवीय यांची या आरोपांवर प्रतिक्रिया आली नसली तरी त्यांनी सिन्हा यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे.

मालवीय यांनी वकिलांमार्फत 8 जूनला ही नोटीस पाठवली आहे. माझ्या अशिलांवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. हे खूप आपत्तीजनक आहे. माझ्या अशिलांच्या प्रतिष्ठेसाठी खूप मारक आहे. त्यामुळे त्यांची समाजातील प्रतिमा मलीन झाली आहे, असे नोटिशीमध्ये म्हटले आहे.

काँग्रेसकडून जोरदार प्रहार

मालवीय यांच्यावर झालेल्या आरोपांनंतर काँग्रेसने भाजपवर जोरदार प्रकार केला आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी मालवीय यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, संघ परिवारातील शंतनू सिन्हा यांनी मालवीयांवर गंभीर आरोप केले आहेत. मालवीय बंगालमधील फाईव्ह स्टार हॉटेल आणि भाजपच्या कार्यालयातही महिलांचे लैंगिक शोषण करतात, असे आरोप सिन्हा यांनी केल्याचे श्रीनेत म्हणाल्या.

बंगालमधील महिलांच्या न्यायाची मागणी आम्ही भाजपकडे करत आहोत. हाथरस, लखीमपूर असो की महिला खेळाडू, बिलकिस बानो, पंतप्रधानांनी सातत्याने आरोपींना राजकीय संरक्षण दिल्याचा आरोपही श्रीनेत यांनी केला आहे. मालवीय यांच्यावरील आरोपांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. भाजपने बंगालमधील संदेशाखाली येथील महिलांवरील अत्याचाराच्या मुद्द्यावर रान उठवले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT