Suresh Gopi : मंत्रिपदाच्या राजीनाम्याचा बॉम्ब टाकणारे सुरेश गोपी मोदी-शाहांसाठी ‘सुपरस्टार!    

Narendra Modi oath Ceremony Kerala MP Suresh Gopi : मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सुरेश गोपी यांनी काही तासांतच राजीनामा देण्याबाबत भाष्य केले आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.  
Amit Shah, Suresh gopi, PM Narendra Modi
Amit Shah, Suresh gopi, PM Narendra ModiSarkarnama

New Delhi : केरळात भाजपला पहिला ऐतिहासिक विजय मिळवून देणारे अभिनेते सुरेश गोपी यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर काही तासांतच खळबळ उडवून दिली आहे. काही तासांतच ते राजीनाम्याची भाषा बोलू लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गळ्यातील ताईत बनलेल्या सुरेश गोपींच्या या भूमिकेमुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी रविवारी सकाळी पंतप्रधान कार्यालयातून खासदारांना फोन जात होते. बहुतेकांशी कार्यालयातील अधिकारी संवाद साधत होते. पण सुरेश गोपी यांना थेट नरेंद्र मोदींनी फोन केला होता, अशी चर्चा आहे. मल्याळम चित्रपटात सुपरस्टार असलेले गोपी राजकारणातही स्टार बनल्याचा हा पुरावाच होता.

एनडीएच्या बैठकीनंतर सुरेश गोपी केरळला परत गेले होते. त्यांना मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा नव्हती. पण मोदींनी त्यांना स्वत: फोन केला आणि दिल्लीत शपथविधीसाठी बोलवून घेतल्याचे समजते. त्यांनी शपथही घेतली. पण काही तासांत त्यांनी चित्रपटांच्या नियोजित कामांचे कारण देत मंत्रिपद न स्वीकारण्याची भूमिका घेतल्याने मोदींनाही धक्का बसला असावा.

अभिनेते ते मंत्री... असा आहे प्रवास

सुरेश गोपी हे केरळातील नावाजलेलं नाव आहे. त्यांचा जन्म 1958 मधील असून वडील चित्रपट वितरक होते. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांना चित्रपटांची आवड निर्माण झाली. उच्च शिक्षित असलेल्या सुरेश गोपी यांनी विज्ञान शाखेतून पदवी तर इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर पदवी घेतली आहे.

Amit Shah, Suresh gopi, PM Narendra Modi
Suresh Gopi: मोदी-शहांच्या सरकारमधील मंत्र्याचा 15 तासांतच राजीनामा?

गोपी यांचा बालकलाकार म्हणून 1965 मध्ये पहिला चित्रपट आला. त्यानंतर 1986 मध्ये त्यांच्या अभिनयाला खऱ्याअर्थाने सुरूवात झाली. 1998 मधील कालियाट्टम चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय आणि केरळ राज्य पुरस्कार मिळाला आहे. मल्लाळम, तेलुगूसह बॉलीवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली. दुरचित्रवाहिन्यांवर त्यांनी काही कार्यक्रमांचे यशस्वी सुत्रसंचालनही केले आहे.

विद्यार्थी प्रतिनिधी ते मंत्री

एकीकडे चित्रपटांमध्ये भूमिका साकारत असताना सुरेश गोपी राजकारणाशीही जोडले गेले होते. महाविद्यालयीन काळात ते भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) आणि स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे सक्रीय सदस्य होते. काँग्रेस आणि इंदिरा गांधींच्या नेतृत्वाबद्द्लही त्यांना आकर्षण होते. पुढे 2006 मध्ये त्यांनी डावी लोकशाही आघाडी (एलडीएफ) आणि युनायडेट डेमोक्रेटिक फ्रंट (यूडीएफ) या केरळातील प्रमुख आघाड्यांच्या उमेदवारांचा प्रचारही केला.

सुरेश गोपी यांचा राजकारणातीलल ओढा वाढत गेला आणि आठ वर्षांपुर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्याआधीच त्यांची राष्ट्रपती नामनिर्देशित सदस्य म्हणून राज्यसभेची खासदारकी देण्यात आली. या काळात केंद्रातील विविध समित्यांमध्येही त्यांना काम केले. त्यानंतर 2019 मध्ये त्रिशूर मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली. मात्र, काँग्रेस उमेदवाराने त्यांचा पराभव केला. त्यांना 2021 मध्ये विधानसभा निवडणुकीतही पराभव पत्करावा लागला.

ऐतिहासिक विजय

मागील अनेक वर्षांपासून भाजप राज्यात लोकसभा निवडणुकीत विजयासाठी प्रयत्न करत होते. पंतप्रधान मोदींसह अनेक नेत्यांनी राज्यात सभा घेतल्या, पण त्यांना यश मिळाले नाही. अखेर 2024 मध्ये सुरेश गोपी यांच्या रुपाने त्यांना पहिला खासदार मिळाला. गोपी यांनी तब्बल 74 हजारांहून अधिक मतांनी त्रिशूर मतदारसंघातून विजय खेचून आणला. त्यांचा हा विजय भाजपला केरळमध्ये नवसंजीवनी देणार ठरला असून सुरेश गोपी भाजपसाठी खऱ्या अर्थाने सुपरस्टार ठरले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com