दिल्ली : काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दिल्ली दौऱ्यावर होते. या दौऱ्यात दोन्ही नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे सर्वोच्च नेते अमित शहा (Amit Shaha) यांची स्वतंत्र भेट घेतली. मात्र हे दोन्ही नेते काल दिल्लीत असताना अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे देखील दिल्लीत दाखल झाले. त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय चर्चांनी जोर धरला.
अशात सोशल मिडीयावर शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यासोबतचा एक फोटो व्हायरल झाला. जोडीला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मार्चमध्ये महाविकास आघाडी सरकार पाडण्याबाबत भविष्यवाणी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
मात्र आता हाच भेटीचा फोटो मॉर्फ असल्याचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन याबाबत खुलासा केला आहे. यात म्हटले आहे अधिवेशनाच्या तोंडावर सरकार पाडण्याच्या 'गजाल्या' सुरू झाल्यात. त्यासाठी 'असले' मॉर्फ केलेले बचकांडे हातखंडे. पण आता मॉर्फला माफी नाही. फसव्या फोटोशॉप जल्पकांचा (ट्रोल्स) शोध घेणे अवघड नाही. महाराष्ट्राच्या सायबर विभागाला असले छुपे छद्मउद्योग करणाऱ्यांना शोधून काढावे ही विनंती.
शरद पवार दिल्लीत कशासाठी दिल्लीत?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार आणि भाजप नेत्यांच्या दौऱ्यांचा कोणताही संबंध नसल्याचे सांगण्यात येत आहे. काल दुपारी अडीच वाजता संसदेच्या डिफेन्स कमिटीची बैठक होती. शरद पवार या कमिटीचे सदस्य आहेत. त्यामुळे या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ते दिल्लीत दाखल झाले असल्याचे सांगण्यात आले.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही या राजकीय चर्चांवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मी आणि चंद्रकांत पाटील भाजपच्या संघटनात्मक बैठकीसाठी दिल्लीत आलो आहे. इथे आमचे संघटनमंत्री आणि इतर सहकारी यांच्यासोबत ४ ते ५ तास बैठक झाली. या बैठकीत पक्षाची पुढील वाटचाल आणि संघटनात्मक बाबींचा आढावा घेण्यात आला. इतर कोणताही आमचा अजेंडा नाही. बाहेर कोणती राजकीय चर्चा सुरू आहे याची कल्पना नसल्याचेही ते म्हणाले.
त्याचसोबत नारायण राणे यांनी काय विधान केले आहे हे मी ऐकलेले नाही. दिल्लीत आल्यावर आम्ही अमित शहा यांचीही भेट घेतली. कारण ते आमच्या पक्षाचे नेते आहेत. त्यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा होत असते. ते आम्हाला मार्गदर्शन करतात असेही फडणवीस म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.