Sharad Pawar  Sarkarnama
देश

Sharad Pawar News : राज्यसभा निवडणुकीनंतर शरद पवारांच्या पक्षाचे नाव बदलणार का?

Election Commission : निवडणूक आयोगाने मंगळवारी शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव दिले आहे.

Rajanand More

Pune : भारतीय निवडणूक आयोगाने मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिले आहे. आयोगाने त्याच दिवशी शरद पवार गटाला राज्यसभा निवडणुकीसाठी त्यांच्या पक्षाच्या नावाचे पर्याय सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार पवार गटातून तीन नावे देण्यात आली होती. त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या नावावर शिक्कामोर्तब केले आहे, पण हेच नाव कायम राहणार की बदलणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. (Sharad Pawar News)

निवडणूक आयोगाकडे (Election Commission) शरद पवार गटाने नवीन पक्षाची तीन नावे आणि तीन चिन्हांचे पर्याय सादर केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदराव पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार असे तीन पर्याय दिले होते. त्यापैकी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हे नाव अंतिम करण्यात आले आहे. पक्षाला चिन्ह मात्र देण्यात आलेले नाही.

आयोगाच्या परिपत्रकानुसार, शरद पवार गटाला देण्यात आलेले नाव हे केवळ राज्यसभा निवडणुकीपर्यंतच्या (Rajya Sabha Election) कालावधीसाठी असणार आहे. या निवडणुकीत पक्षाच्या चिन्हाचा वापर होत नाही. त्यामुळे शरद पवार गटाला चिन्ह देण्यात आलेले नाही. निवडणुकीनंतर पक्षाला नवीन नावासाठी पुन्हा अर्ज करावा लागेल. अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही याबाबत स्पष्ट केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पटेल यांनी मीडियाशी बोलताना सांगितले होते की, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव केवळ राज्यसभा निवडणुकीपुरतेच आहे. 27 फेब्रुवारीपर्यंतच हे नाव राहील. त्यानंतर निवडणूक आयोगाकडे पक्षाच्या नवीन नावासाठी अर्ज करावा लागेल.’ शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही हे नाव राज्यसभा निवडणुकीपुरतेच असल्याचे आज स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीनंतर नवीन नावासाठी शरद पवार गटाला नव्याने अर्ज करावा लागू शकतो, पण त्यावेळीही सध्या मिळालेले नाव कायम ठेवण्याचा आग्रहही धरला जाऊ शकतो, अशीही चर्चा आहे.

आयोगाकडून नवे नाव मिळाल्यानंतर शरद पवार गटाच्या सर्व सोशल मीडिया खात्यांचे जुने नाव बदलण्यात आले आहे. तसेच आज पुण्यात झालेल्या विजय निश्चय मेळाव्यात लावण्यात आलेल्या फलकावरही नवे नाव होते. शरद पवार गटाला नवीन नाव मिळणार, की निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीसाठीही हेच नाव कायम ठेवले जाणार, हे 27 फेब्रुवारीनंतरच स्पष्ट होईल.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT