Sharad Pawar political strategy : क्रॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे मागील काही दिवसांत दिल्लीतील राजकारण चांगलेच तापले आहे. संसदेचे अधिवेशन सुरू होण्याच्या दिवशीच आंदोलकांनी संसदेवर मोर्चा काढला. यादरम्यान पोलिसांच्या लाठीचार्जमुळे काही आंदोलक जखमी झाले आहेत. त्यावरून विरोधक आक्रमक झाले असून मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी जंतरमंतरवर जाऊन सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांची भेट आंदोलनाला पाठिंबा दिला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी पवारांनी अचानक पंतप्रधान मोदींची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. पवारांसोबत खासदार सुप्रिया सुळे याही मोदींना भेटल्या.
शरद पवारांनी दीपके यांची घेतलेली भेट अन् त्यानंतर काही तासांत मोदींच्या भेटीमुळे चर्चांना उधाण आले आहे. ही भेट नेमकी कोणत्या मुद्द्यावर झाली, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. आंदोलकांच्या मागण्या पवारांनी मोदींच्या कानावर घातल्या असाव्यात, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, पोलिसांचा विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज हे मुद्देही मांडले असावेत, अशी चर्चा आहे.
एकीकडे काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांकडून संसदेत आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज आणि नीट पेपरफुटीवर संसदेत चर्चा करण्याची मागणी होत आहे. यासंदर्भात पंतप्रधान अद्यापपर्यंत विरोधकांमध्ये कुणालाही भेटलेले नाहीत. संसदेचे कामकाज सलग तिसऱ्या दिवशीही होऊ शकलेले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा सरकार आणि विरोधक आमनेसामने उभे ठाकले आहेत. या घडामोडी घडत असतानाच मोदी आणि पवारांच्या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे.
दरम्यान, मंगळवारी जंतरमंतरवर आंदोलकांची भेट घेत शरद पवारांनी त्यांची विचारपूस केली होती. आपल्या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर व नागरिकांवर दडपशाही करण्यापेक्षा सरकारने त्यांच्या मागण्याचा संवेदनशीलपणे विचार करावा तसेच त्यांच्या मागण्यांची दखल घेत योग्य ती कार्यवाही करावी, असे पवारांनी सोशल मीडियात केलेल्या पोस्टमध्ये म्हटले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.