NDA expansion : ओमराजे, राघव चड्ढा अन् सायोनी घोष यांचा हातात हात! 'मंगल मिलना'मागचे अमंगल राजकारण...

Omprakash Rajenimbalkar, Raghav Chadha, Saayoni Ghosh, BJP : उद्धव ठाकरे, केजरीवाल, ममता बॅनर्जी यांच्यावर निष्ठेची ग्वाही देणारे ओमराजे, राघव चड्ढा, सायोनी घोष आता एनडीएसोबत; समर्थकांमध्ये विश्वासघाताची भावना
Omprakash Rajenimbalkar, Raghav Chadha, Saayoni Ghosh
Omprakash Rajenimbalkar, Raghav Chadha, Saayoni GhoshSarkarnama
Published on
Updated on

NDA Politics : संसदेचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार असल्याचे पहिल्या दोन दिवसांतच स्पष्ट झाले आहे. नीटसह विविध पेपरफुटी, सीबीएसई परीक्षेतील ओएमआरवरून उडालेला गोंधळ आदी मुद्द्यांवर कॉक्रोच जनता पार्टीचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरू आहे. सोमवारच्या संसदेवरील मोर्चानंतर या आंदोलनाची तीव्रता वाढली असून विरोधी पक्षांनीही आता रस्त्यावर उतरत त्यात उडी घेतली आहे. 'एनडीए'च्या मंगळवारच्या संसदीय दलाच्या बैठकीवरही त्याचे सावट होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदीय दलाच्या बैठकीत मार्गदर्शन करत पहिल्यांदाच पेपरफुटीवर भाष्य केले. सर्व मित्रपक्षांचे खासदार या बैठकीला होते. खरंतर संपूर्ण देशाचे लक्ष आंदोलनावर असले तरी एनडीएसाठी ही बैठक खास होती. चार महिन्यानंतर एनडीएची ताकद वाढली आहे. अधिवेशन काळात प्रत्येक मंगळवारी होणाऱ्या या बैठकीला भाजपने 'मंगल मिलन' असे नाव दिले आहे. आंदोलनामुळे सध्या सरकारसाठी सर्वकाही अमंगल घडत असले तरी एनडीएची राजकीय ताकद वाढल्याने निश्चितच सरकारचा आत्मविश्वासही वाढलेला असणार.

अशी वाढली 'एनडीए'ची ताकद

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकसभेतील सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्यांच्या विलीनीकरणाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मान्यता दिली आहे. आम आदमी पक्षाच्या सात खासदारांनीही स्वतंत्र गट करत तो भाजपमध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला. त्यावरही शिक्कामोर्तब झाले आहे. तर तृणमूल काँग्रेसच्या लोकसभेतील तब्बल २० खासदारांनी एनसीपीआय या पक्षात विलीन होण्याचा निर्णय घेत एनडीएला पाठिंबा जाहीर केला आहे. बिर्ला यांनी या खासदारांनाही हिरवा कंदील दाखविला आहे.

Omprakash Rajenimbalkar, Raghav Chadha, Saayoni Ghosh
Delhi student protest : दिल्लीत लाठीचार्जमध्ये जखमी झालेली विद्यार्थिनी व्हेंटिलेटरवर; नड्डा, राहुल गांधींची रुग्णालयात धाव...

मागील चार महिन्यांत तब्बल ३३ खासदारांचे एनडीएला पाठबळ मिळाले आहे. मात्र, हे पाठबळ वाढण्यामागचे 'अमंगल' राजकारणाकडे पाठ दाखवून चालणार आहे. सर्व ३३ खासदार हे एनडीएच्या विरोधात निवडून आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजप आणि एनडीएच्या नेत्यांवर, सरकारवर टीकेचे बाण सोडत त्यांना घायाळ केले होते. पण पक्षांतर्गत मतभेद अन् विकासाच्या नावाखाली या खासदारांनी जनमताच्या विरोधात जाऊन सत्ताधारी गोटात सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यावर विरोधकांनी गद्दारीचा शिक्का मारला आहे.

ओमराजे, राघव चड्ढा, सायोनी घोष...

राजकीय घडामोडींमध्ये ओमप्रकाश राजेनिंबाळकर, राघव चड्ढा आणि सायोनी घोष या तीन नेत्यांची बरीच चर्चा झाली. हे तिन्ही नेते संसदेत आणि रस्त्यांवरही विरोधात असताना सरकारविरोधात रान उठवायचे. तिघांच्याची निष्ठेचे दाखले दिले जायचे. ओमराजेंची उद्धव ठाकरेंवरील, राघव चड्ढा यांनी अरविंद केजरीवालांवरील आणि घोष यांची ममता बॅनर्जींवरील निष्ठा सांगतानाची या नेत्यांची विधाने पाहिलीत तर भल्याभल्यांना तोंडात बोटे घालावी लागतील.

Omprakash Rajenimbalkar, Raghav Chadha, Saayoni Ghosh
Eknath Shinde vs Ganesh Naik : आयुक्तांच्या खांद्यावर बंदूक ठेवत एकनाथ शिंदेंनी काही तासांतच नाईकांचा डाव हाणून पाडला!

राघव चड्ढा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सायोनी यांनी पश्चिम बंगालच्या निवडणुकीदरम्यान वादग्रस्त विधान केले होते. 'मै राघव चड्ढा नहीं, जो चड्ढी बन जाऊं', असे घोष म्हणाल्या होत्या. ममतांवरील निष्ठा सांगताना त्यांना शब्द अपुरे पडत होते. ओमराजे अन् चड्ढा यांचीही तीच गत होती. महाराष्ट्रातील शिवसैनिकांना ओमराजेंवर प्रचंड विश्वास होता. पण आता या तिघांचीही निष्ठा एनडीएसोबत आहे. तिघांचेही आता हातात हात आहेत. आता हे तिन्ही नेते संसदेसह रस्त्यावरही सरकारचे गुणगान गातील. केवळ चार महिन्यांत झालेले हे मंगल मिलन नसून अमंगल राजकारण असल्याची त्यांच्या समर्थकांची भावना असणार.

राजकारणात अनेकदा अनपेक्षित घडामोडी घडत असतात. पण मागील चार महिन्यांतील घडामोडींनी एक नव्हे तीन पक्ष फोडले आहेत. दोन तृतियांश खासदारांचा गट करून तीन पक्षांतील सदस्य बाहेर पडले आहेत. कदाचित भारताच्या राजकारणात पहिल्यांदाच काही दिवसांच्या अंतराने तीन राजकीय पक्षांचे एवढे खासदार सत्ताधारी पक्षात सामील झाले असावेत. या घडामोडींशी आमचा काही संबंध नाही, अशी विधाने भाजप नेते करत आहेत. समझने वालों को इशारा कॉफी है!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com