Shashi Tharoor and Women MP.
Shashi Tharoor and Women MP.  Sarkarnama
देश

शशी थरूर ट्रोल झाले पण सेल्फी त्यांनी काढलीच नव्हती!

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : संसदेच्या (Parliament) हिवाळी अधिवेशनाचा (Winter Session) पहिला दिवस तीन गोष्टींमुळे वादळी ठरला. पहिली गोष्ट म्हणजे, कृषी कायदे मागे घेण्याचे विधेयक गोंधळातच मोदी सरकारने लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर करून घेतले. दुसरी गोष्ट म्हणजे, मागील अधिवेशनात निलंबित केलेल्या राज्यसभेच्या 12 सदस्यांचे निलंबन चालू अधिवेशनात कायम ठेवण्यात आले आहे. यातील तिसरी गोष्ट म्हणजे काँग्रेस (Congress) नेते शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी न घेतलेली सेल्फीही (Selfie) अतिशय गाजली आहे.

काँग्रेस खासदार शशी थरूर हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. ते अनेक कारणांमुळे सतत चर्चेत असतात. आज त्यांनी ट्विटरवर एक सेल्फी शेअर केली होती. ही सेल्फी अतिशय व्हायरल झाली. यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी 6 महिला खासदारांसोबतची ही सेल्फी व्हायरल होत आहे. ही सेल्फी शेअर करताना त्यांनी दिलेल्या ओळींमुळे थरूर यांना ट्रोल व्हावे लागले आहे.

या सेल्फीमध्ये थरूर यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रियो सुळे, काँग्रेसच्या खासदार प्रणित कौर, द्रमुकच्या खासदार डॉ. तमिळाची थंगापांडियन, तृणमूलच्या खासदार व अभिनेत्री मिमी चक्रवर्ती व नुसरत जहाँ आणि काँग्रेसच्या खासदार ज्योतिमणी यांचा समावेश होता. या सेल्फीवरून थरूर ट्रोल झाले असले तरी ती मिमी चक्रवर्ती यांनी काढली होती आणि ती बहुतांश महिला खासदारांनी सोशल मीडियावर शेअर केली होती. थरूर यांनी दिलेल्या ओळींमुळे त्यांना ट्रोल करण्यात आले आहे.

कोण म्हणतं लोकसभा ही कामासाठी आकर्षक जागा नाही? अशी ओळ थरूर यांनी या सेल्फीसोबत दिली होती. यामुळे वादाची ठिणगी पडली आणि ते ट्रोल झाले. वकील करुणा नंदी यांनीही थरूर यांच्यावर टीका केली. शशी थरूर यांनी निवडून आलेल्या राजकीय नेत्यांना त्यांच्या दिसण्यापुरते मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे आणि स्वतःला केंद्रस्थानी दाखवले आहे, असे ताशेरे त्यांनी ओढले आहेत.

अखेर थरूर यांनी दिलगिरी व्यक्त करून या वादावर पडदा टाकणे पसंत केले आहे. त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, महिला खासदारांसोबत ही सेल्फी विनोदाच्या उद्देशाने काढण्यात आली होती. त्याच सहजपणे त्यांनी मला ती ट्विट करण्यास सांगितली होती. काही लोकांच्या भावना यामुळे दुखावल्या गेल्या याबद्दल मला वाईट वाटते. हे सगळ एवढेच आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT