नवी दिल्ली : संसदेच्या (Parliament) हिवाळी अधिवेशनाची (Winter Session) सुरूवातच वादळी ठरली आहे. मागील अधिवेशनात निलंबित करण्यात आलेल्या राज्यसभेच्या 12 सदस्यांना या अधिवेशन काळासाठी निलंबित करून मोदी सरकारने विरोधकांना मोठा धक्का दिला. यामुळे हे 12 खासदार या अधिवेशनाला मुकले आहेत. या प्रकरणी शिवसेनेच्या (Shivsena) खासदार प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी (ता. 11 ऑगस्ट) झालेल्या गोंधळप्रकरणी निलंबित खासदारांमध्ये प्रियांका चतुर्वेदी यांचा समावेश आहे. त्या म्हणाल्या की, तुम्ही मागील संसद अधिवेशनाचे सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यास कशा प्रकारे पुरुष मार्शल महिला खासदारांना धक्काबुक्की करीत होते, हे तुम्हाला दिसेल. हे सगळ्या एका बाजूला आणि तुमचा आजचा निर्णय दुसऱ्या बाजूला? सरकारचे हे कोणत्या प्रकारचे असंसदीय वर्तन सुरू आहे. जिल्हा न्यायालय ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत आरोपींना बाजू मांडण्याची संधी दिली जाते. त्यांना वकील दिले जातात तर कधी सरकारी अधिकारी त्यांची बाजू ऐकायला जातात. संसदेत आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधी दिलीच नाही.
सभागृहात बेशिस्त वर्तनाचे कारण देत 12 खासदारांचे निलंबन चालू अधिवेशनात कायम ठेवण्यात आले आहे. त्यांना आता अधिवेशन संपेपर्यंत कामकाजात सहभाग घेता येणार नाही. या बारा जणांमध्ये शिवेसेनेचे खासदार अनिल देसाई व प्रियांका चतुर्वेदी यांचाही समावेश आहे. तसेच काँग्रेसचे सहा, तृणमूल काँग्रेसचे दोन आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या प्रत्येकी एका खासदाराचा समावेश आहे.
पावसाळी अधिवेशनादरम्यान शेवटच्या दिवशी राज्यसभेत मोठा गदारोळ झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट केंद्र सरकारवर आरोप करत बाहेरून सभागृहात 40 हून अधिक जणांना आणल्याचा व महिला खासदारांवर हल्ला केल्याचा आरोप केला होता. राज्यसभेत विमा विधेयक सादर केल्यानंतर त्यावरील चर्चेदरम्यान हा गोंधळ झाला होता. त्यावेळी सभागृहात मार्शल बोलावण्यात आले होते. त्यावरूनही मोठा गदारोळ निर्माण झाला होता. मार्शल आणि खासदारांमध्ये धक्काबुक्की झाली होती. या घटनेनंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता.
मागील अधिवेशनात झालेल्या गोंधळातील खासदारांना निलंबित करण्याचा प्रस्ताव आधीपासून विचाराधीन होता. त्यावर सोमवारी शिक्कामोर्तब करत बारा जणांना निलंबित करण्यात आले. दरम्यान, मागील अधिवेशनात झालेला गोंधळ या अधिवेशनात होऊ नये, याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सकाळीच विरोधकांना आवाहन केले आहे. पण कृषी कायदे मागे घेण्याच्या विधेयकांवर चर्चा न झाल्याने विरोधकांनी जोरदार घालता. त्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
निलंबित बारा खासदार पुढीलप्रमाणे -
1. प्रियांका चतुर्वेदी (शिवसेना)
2. अनिल देसाई (शिवसेना)
3. अखिलेश प्रसाद सिंग (काँग्रेस)
4. सईद नासीर हुसेन (काँग्रेस)
5. राजमनी पटेल (काँग्रेस)
6. रिपून बोरा (काँग्रेस)
7. छाया वर्मा (काँग्रेस)
8. फुलो देवी नेतम (काँग्रेस)
9. शांता छेत्री (टीएमसी)
10. डोला सेन (टीएमसी)
11. एलामराम करीम (सीपीएम)
12. बिनॉय विश्वम (सीपीआय)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.