Sheikh Hasina Sarkarnama
देश

Sheikh Hasina : "मी लवकरच..." शेख हसीना यांचा फोन कॉल लीक; बांगलादेशबद्दल चिंता व्यक्त करत केलं मोठं विधान

Jagdish Patil

Bangladesh News : बांगलादेशात हिंसाचार उसळल्यानंतर माजी पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) भारतात पळून आल्या होत्या. त्यानंतर बांगलादेशात मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार स्थापन करण्यात आलं. हेच सरकार आता हसीना यांना देशात परत आणण्याची मागणी करत आहे.

शिवाय यासाठी सरकार सर्व प्रयत्न करत आहे. अशातच आता एक फोन कॉल व्हायरल होत आहे, जो शेख हसीना यांचा असल्याचा दावा करण्यात येत आहे. दहा मिनिटांच्या या कॉलमध्ये शेख हसीना बांगलादेशबद्दल चिंता व्यक्त करत आहेत.

शिवाय मी आपल्या देशापासून दूर नाही आणि गरज पडल्यास लवकरच परत येईन असंही त्या म्हणत आहेत. त्यांचा हा फोन कॉल व्हायरल होताच सोशल मीडियावर आणि बांगलादेशच्या (Bangladesh) राजकारणात वाद निर्माण झाला आहे.

बांगलादेशातील मीडिया हाऊस ढाका ट्रिब्यूनने दिलेल्या माहितीनुसार, हसीना आणि अमेरिकेत राहणाऱ्या तनवीर नावाच्या व्यक्तीमध्ये हा फोन कॉल झाला होता. तो ढाका येथील रहिवासी आहे. या कॉलमध्ये तनवीर हसीना (Sheikh Hasina) यांना अवामी लीगच्या नेत्यांना येत असलेल्या अडचणींबद्दल माहिती देतो. शिवाय या कायदेशीर बाबींमुळे नेत्यांना मतदारसंघाबाहेर राहण्यास मजबूर असल्याचंही सांगतो.

यावर उत्तर देताना हसीना म्हणाल्या, तिथे अनेक कायदेशीर आव्हाने असून माझ्यावरच 113 विविध गुन्हे दाखल आहेत. तनवीर बांगलादेशात परतला तर त्याला कायदेशीर अडचणी येऊ शकतात, असा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान, यावेळी हसीना यांनी बांगलादेशच्या ढासळत्या आर्थिक स्थितीवरही भाष्य केलं.

देश पुन्हा गरिबीच्या दिशेने जात असून सध्याचे सरकार बँकांची लूट करत आहे. तसेच सरकारने अत्यावश्यक सेवा बंद केल्याचा आरोपही त्यांनी केला. रूपपूर अणुऊर्जा प्रकल्पातील कथित भ्रष्टाचाराचा उल्लेख करताना त्या म्हणाल्या, लोक मूर्ख बनले असतील तर मी काहीही करू शकत नाही.

या कॉलमध्ये हसीना यांना गाझियाबादहून दिल्लीला हेलिकॉप्टरने नेण्यात आल्याचा दावा त्यांनी फेटाळला आहे. शिवाय या संदर्भातील पुरावे त्यांनी मागितले आहेत. सर्वात महत्वाची बाब म्हणजे, गरज पडल्यास बांगलादेशात परत येऊ शकते, कारण मी देशाच्या खूप जवळ आहे, असंही त्या म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT