Eknath Shinde-Rajendra Singh Gudha
Eknath Shinde-Rajendra Singh Gudha Sarkarnama
देश

Rajasthan Assembly Election : राजस्थानच्या निवडणुकीत शिंदे गट उमेदवार उभे करणार; बडा नेता शिवसेनेच्या गळाला

Vijaykumar Dudhale

Jaipur News : राजस्थान विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला असून, काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षामध्ये जोरदार लढाई सुरू आहे. आता राजस्थानच्या लढाईत शिवसेना (शिंदे गट) उतरणार आहे. शिंदे गटाच्या गळाला राजस्थानमधील एक मोठा नेता लागला असून, त्यांना शिवसेनेकडून तिकीट देण्यात येणार आहे. (Shiv Sena of Shinde group will field candidate in Rajasthan elections)

अशोक गेहलोत यांच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आलेले, तसेच विधानसभेत लाल डायरी फडकविल्याबद्दल राजेंद्रसिंह गुढा यांना बडतर्फ करण्यात आले आहे. ते राजेंद्रसिंह आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभा निवडणुकीत आपले नशीब पुन्हा आजमावणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राजेंद्रसिंह गुढा हे उदयपूर वाटी मतदारसंघातून धनुष्य बाण या चिन्हावर निवडणूक लढविणार आहेत. शिंदे गटाचे नेते शिवसेनेचा एबी फार्म घेऊन राजस्थानमध्ये पोचले आहेत. ते गुढा यांना एबी फार्म देतील, त्यानंतर गुढा हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान, शिंदे गट इतरही काही जागांवर निवडणूक लढवता येईल का, याचीही चाचपणी करत आहे.

दरम्यान, गुढा यांना वसुंधरा राजे मुख्यमंत्री असताना रास्ता रोको आंदोनावरून मला कारागृहात टाकले होते. तब्बल ३८ दिवस गुढा हे तुरुंगात होते. त्यावेळी त्यांनी वसुंधरा राजे यांच्या विरोधात मोहीम उघडली होती. आताही त्यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात बोलणे सुरू केले आहे. गेहलोत हे मला तुरुंगात पाठवू इच्छित आहेत, त्यांचेही हाल वसुंधरा राजे यांच्यासारखे करू, असे गुढा म्हणत आहेत.

हेच राजेंद्रसिंह गुढा हे आता शिंदे गटाकडून धनुष्य बाणाच्या चिन्हावर आता राजस्थान विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. ते आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. या निवडणुकीत त्यांना किती यश येते, हे पाहण्यासाठी तीन डिसेंबरच्या मतमोजणीची वाट पाहावी लागणार आहे.

म्हणून निवडणूक आयोगाने मतदानाची तारीख बदलली

निवडणूक आयोगाने ९ ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेऊन २३ नोव्हेंबर रोजी राजस्थानमध्ये मतदान होणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, २३ नोव्हेंबर ही लग्नाची तिथी असल्याने मतदानावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्वपक्षीयांनी मतदानाची तारीख बदलण्याची विनंती केंद्रीय निवडणूक आयोगाला केली होती. त्यानंतर २३ नोव्हेंबर ही तारीख बदलून २५ नोव्हेंबर करण्यात आली आहे. मतमोजणी मात्र ३ डिसेंबरलाच असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT