Uddhav Thackeray Sarkarnama
देश

Shivsena UBT : ठाकरेंचे 6 खासदार खरंच फुटले का? शिवसेनेतील विलीनीकरणाच्या चर्चांवर शंका येण्याची 5 कारणं

Shivsena UBT : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे ६ खासदार फुटल्याची, त्यांच्या स्वतंत्र गटाला मान्यता दिल्याची आणि आता ते शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

Amit Ujagare

Shivsena UBT : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे ६ खासदार फुटल्याची, त्यांच्या स्वतंत्र गटाला मान्यता दिल्याची आणि आता ते शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. पण या केवळ चर्चाच असल्याची शंका आता यायला लागली आहे. या शंका येण्याची काही कारणंही आहेत, त्यामुळं हा नेमका काय प्रकार सुरु आहे? जाणून घेऊयात.

परभणीचे खासदार संजय जाधव, यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील अष्टीकर, धाराशीवचे खासदार ओम राजेनिंबाळकर, ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील आणि शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे सहा खासदार फुटल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. याबाबत माध्यमांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहेत, त्यावर काही राजकारण्यांनी देखील भाष्य केलेलं आहे. हे सहाही खासदार फुटल्याची चर्चा काल रात्री ११ वाजण्याच्या सुमारास सुरु झाली. याला आता २० तास होत आले आहेत. तसंच या सहा जणांच्या गटानं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून आपल्या गटाला मान्यता देण्यात यावी, अशी मागणी केल्याचंही सांगितलं जात आहे. या गटाला अध्यक्षांनी मान्यता दिल्यानंतर शिंदेंच्या शिवेसेनेत त्यांच्या गटाच्या विलीनीकरणाची प्रक्रिया सुरु असल्याचंही बोललं जात आहे. पण तरीही हे लोक फुटले आहेत का? अशी शंका आता यायला लागली आहे.

शंका यायची पाच कारणं

ठाकरेंचे ६ खासदार फुटले असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. पण यावर शंका येण्याची पाच प्रमुख कारण अशी आहेत...

१) खासदारांनी वेगळा गट करुन काल रात्रीच उशीरा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिल्याची चर्चा आहे, पण अद्याप हे पत्र समोर आलेलं नाही.

२) या खासदारांनी आज सकाळी दिल्लीत जाऊन ओम बिर्ला यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. पण या भेटीचा सर्वांचा एकत्रित असा कुठलाही फोटो समोर आलेला नाही.

३) त्याचबरोबर जर या खासदारांच्या गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्यात आली असेल तर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचं कुठंलही अधिकृत पत्रही समोर आलेलं नाही.

४) फुटलेल्या खासदारांपैकी अद्याप एकही खासदार माध्यमांच्या समोर येऊन बोललेला नाही, २० तास झाले तरी आपल्या बंडखोरीबाबतची भूमिका त्यांनी अद्याप मांडलेली नाही.

५) ज्या पक्षात ते विलीन होणार आहेत, त्या शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी अद्याप समोर येऊन या खासदारांबाबत याबाबत कुठलंही स्पष्टीकरण दिलेलं नाही.

तृणमूलच्या खासदारांप्रमाणं...

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच तृणमूल काँग्रेसचे २८ पैकी २० खासदार फुटले होते, ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा या खासदारांनी दिल्लीत भाजपचे केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांच्या घरी एकत्र बैठक घेतली, या बैठकीचा फोटोही माध्यमांनी समोर आणला होता. त्याचबरोबर या बंडखोर खासदारांच्या गटानं लोकसभा अध्यक्षांना पत्रही दिलं होतं की, आम्हाला वेगळा गट म्हणून मान्यता द्या, हे पत्रही समोर आलं होतं. त्यामुळं हे खासदार फुटले असल्याचं स्पष्ट झालं होतं. पण आजच्या घडामोडीत ठाकरेंच्या खासदारांबाबत असे कुठलेही पुरावे अद्याप तरी समोर आलेले नाहीत. उलट आता दोन खासदारांशी संपर्क झाला असून ते ठाकरेंसोबतच असल्याचं सांगण्यात येत आहे.

SCROLL FOR NEXT