Maharashtra Politics : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. या खासदारांना १५-१५ कोटी रुपये अॅडव्हान्स दिल्याचे खुद्द खासदार संजय राऊत यांनीच सांगितले आहे. त्यामुळे एकप्रकारे त्यांनी फुटीवर शिक्कामोर्तब केले आहे. आज दिल्लीत मोठ्या घडामोडी घडत असतानाच ठाकरेंचे तीन खासदार एकत्रितपणे पहिल्यांदाच मीडियासमोर आले.
खासदार संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी हे तिन्ही खासदार आहेत. यामध्ये मुंबईतील खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्यासोबत राऊतांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना राऊत म्हणाले, ऑपरेशन टायगर सोपं नाही. मुळात त्यांनी मान्य केले की, आम्ही अजूनही टायगर आहोत. आमच्यापर्यंत अशाप्रकारच्या कोणत्याही घडामोडींची अधिकृत माहिती नाही. तुमच्या माध्यमातून या बातम्या पाहत आहोत आणि प्रतिक्रिया देत आहोत. काल रात्री मला १०.३०-११ वाजता एका महत्वाच्या व्यक्तीकडून सांगण्यात आले की, महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेतलं जातंय. पक्षाचे नाव त्यांनी घेतलं नाही. मीही घेणार नाही. भाव ५० कोटी असून रात्रीत १५-१५ कोटी पोहचतील. नंतर ते दिल्लीत येतील, असे मला सांगण्यात आले.
कुणी अशापध्दतीने तृणमूल काँग्रेस, शिवसेना किंवा अन्य पक्ष फोडले जात असतील तर या देशात निवडणुका लढण्याला काही अर्थ नाही. आमच्या खासदारांची नावे येत आहेत, ते कुठे आहेत ते माहिती नाही. ते सर्व खासदार शिवसेनेच्या मशाल चिन्हावर आणि उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर निवडून आले आहेत. आधीच्या फुटीवेळी सांगितले जात होते की, ते बंड होते, मोदींच्या चेहऱ्यावर निवडून आले. ती निवडणूकही संपली. पण हे खासदार ठाकरेंच्या मेहनतीवर निवडून आले आहेत. त्यामुळे कुणालाही अशाप्रकारे बेईमानी करण्याचा अधिकार नाही, असे राऊत म्हणाले.
मागे जे काही झाले, त्याची पुनरावृत्ती पुन्हा होणार असेल तर यावेळी जनता आणि शिवसैनिक गप्प बसणार नाहीत. जो काय राडा व्हायचाय तो होईल. ही डरपोकगिरी आता खपवून घेतला जाणार नाही. आमची मातोश्रीवर झालेल्या बैठकीत चार खासदार उपस्थित होते. उर्वरित पाच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर होते. त्यातील एका खासदाराने तीन मिनिटांत चारवेळा साईबाबांची शपथ घेतली. एका आई भवानीची शपथ घेतली. एकाने मुलीची शपथ घेतली. कुणी मुलाची कुणी आईची शपथ घेतली. कुणी बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेतली. अशा शपथा घेतल्यानंतर विश्वास ठेवणे अनिवार्य असते, असे राऊतांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्रातील जनता एकदा गप्प बसली. आता गप्प बसणार नाही. ज्यांना जायचंय त्यांनी आधी राजीनामा द्यावा. आमच्या मतदारांनी तुम्हाला निवडून दिले आहे. पक्षाने कायदेशीर बाबी सुरू केल्या आहेत. अरविंद सावंत यांनी व्हीप जारी केला आहे. उद्या संसदीय दलाची बैठक आहे. ओम बिर्ला यांनाही पत्र लिहिण्यात आले असल्याची माहिती राऊत यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.