Shivsena Vs BJP: सार्वजनिक बांधकाम विभागाचे मराठवाडा विभागाचे मुख्य अभियंता तथा फुलंब्री विधानसभा मतदार संघाच्या भाजप आमदार अनुराधा चव्हाण यांचे पती अतुल चव्हाण यांनी दिलेल्या तडकाफडकी राजीनाम्याने राजकीय व प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.
छत्रपती संभाजीनगर शासकीय रुग्णालयातील रखडलेल्या बांधकाम विभागाशी संबंधित कामावरून पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी अतुल चव्हाण यांच्यासह त्यांच्या विभागाच्या अधिकाऱ्यांची सर्वांसमोर खरडपट्टी काढली होती. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. जाहीरपणे झालेला हा अपमान सहन न झाल्यामुळेच मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू होती. तर सचिव पदाचे प्रमोशन न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या अतुल चव्हाण यांनी चार वर्षांपूर्वीच राजीनामा दिला असेही बोलले जात आहे.
ते सक्रिय राजकारणात उतरणार असाही अंदाज काही जणांनी वर्तवला. आगामी 2029च्या लोकसभा निवडणुकीत उतरण्यासाठी ते भाजपकडून तयारी करत असल्याचेही बोलले गेले. मात्र, या सर्व तर्कवितर्कांवर अतुल चव्हाण यांनी खुलासा करत पूर्णविराम दिला आहे.
पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयातील 14 कोटींचा निधी मंजूर असतानाही बांधकाम विभागाने दोन वर्षात डागडुजी आणि दुरुस्तीची कामे का केली नाही? एवढ्या निधीमध्ये घाटीची नवी इमारत उभी राहिली असती, असे म्हणत अतुल चव्हाण यांच्या समक्ष बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सुनावले होते. मात्र, आपल्या राजीनाम्याचा आणि याचा काहीही संबंध नाही, उलट बांधकाम विभागाचे अधिकारी काम करत नाही म्हणून पालकमंत्री संजय शिरसाठ यांना आपणच शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये पाहणीसाठी बोलवले होते, असा खुलासा चव्हाण यांनी केला आहे.
सचिव पदासाठी इच्छुक असताना ते न मिळाल्यामुळे आलेल्या नाराजीतून राजीनामा दिला का? याचाही खुलासा अतुल चव्हाण यांनी केला आहे. मुख्य अभियंता पदाला तांत्रिक निर्णयाची जे अधिकार आहेत ते सचिव पदाकडे नसतात त्यामुळे मी सचिव पदासाठी आग्रही नव्हतो असे स्पष्ट करत त्यांनी हा आरोपही फेटाळला.
32 वर्ष शासकीय सेवा केली आता उर्वरित वेळ समाजकार्यासाठी द्यायचा आहे म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे. आपल्या या निर्णयाची कल्पना कुटुंबीयांनाही नव्हती असे सांगत या राजीनाम्यामुळे पत्नी आमदार अनुराधा चव्हाण या आपल्यावर नाराज झाल्या आणि त्यांनी दिवसभर अबोला धरला असेही चव्हाण यांनी सांगितले.
आमदार पत्नी अनुराधा चव्हाण या अतुल चव्हाण यांच्या राजीनाम्यावर नाराज आहेत. तसेच अतुल चव्हाण यांचे हितचिंतक मित्र आणि सामाजिक संघटनांनी ही त्यांच्यावर राजीनामा मागे घेण्यासाठी दबाव आणल्याची चर्चा आहे. सर्वांच्या भावना लक्षात घेता अतुल चव्हाण आपला राजीनामा मागे घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.