Lok Sabha Security Breach: लोकसभेतील प्रेक्षक गॅलरीतून दोन जणांनी सुरक्षा भेदून सभागृहात उडी मारल्याने बुधवारी संसदेत मोठा गोंधळ उडाला. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली. तसेच दिल्ली पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे. या घटनेवर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया देत मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
"संसदेतील घटनेनंतर हे सरकार किती तकलादू आहे, हे आता जनतेला कळलं असेल. या देशात सुरक्षेच्या नावाने बोंबाबोंब आहे. सीमा, सीमावर्ती राज्य, लोकं आणि काल पार्लमेंटमध्ये घटना घडली. सरकारची आता वाचा गेलीय.
हे सरकार बधीर झालं आहे, ते निवडणूक प्रचार, शपथविधीत व्यस्त आहेत. आता जनतेला समजलं असेल की, हे सरकार किती तकलादू पायावर उभा आहे", अशी घणाघाती टीका खासदार राऊतांनी केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"जम्मू काश्मीर, लढाख तिकडे अतिरेकी कसे घुसतात, हे आता जनतेला समजलं असेल. बुधवारी संसदेत त्या तरुणांनी गॅलरीतून उड्या मारल्या. कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था भेदून कुठंही जाऊ शकतं, हे काल दिसलं. ज्या तरुणांना पकडलं त्यांचा मार्ग चुकीचा, त्यांनी मांडलेल्या भावना देशाच्या होत्या.
त्यांना वडे तळायला देखील कुठं जागा नाही. ही अराजकाची सुरुवात आहे. त्यांच्या दृष्टीने ही क्रांती आहे, पण आमच्या दृष्टीने हा अतिरेक आहे. या तरुणांकडून झालेला अतिरेक देशासाठी घातक आहे, त्यांचं समर्थन अजिबात नाही", असं राऊत म्हणाले.
संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे समोर आले असून अधिवेशनाचे कामकाज सुरु असतानाच दोन अज्ञात व्यक्ती सभागृहात घुसल्याची घटना बुधवारी घडली. तर संसदेच्या बाहेर दोघांनी घोषणाबाजी केली. यामध्ये एका तरुणीचाही सहभाग आहे. ती तरुणी उच्च शिक्षित असल्याची माहिती आहे.
तर दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी 'पीएच.डी'च्या विद्यार्थ्यांबद्दल बोलताना "पीएच.डी करून काय दिवे लावणार ?", असे विधान केले होते. आता त्यांच्या या विधानावरून खासदार राऊतांनी खोचक टोला लगावला आहे. "संसदेत घडलेल्या घटनेत एक मुलगी पीएच.डी करत आहे, तिला अजित पवारांनी मार्गदर्शन करावं", असं म्हणत राऊतांनी टोला लगावाला.
(Edited by- Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.