Adar Poonawalla and Narendra Modi  Sarkarnama
देश

पुन्हा पहिल्यासारखाच लालफितीचा कारभार! पूनावालांनी मोदी सरकारला सुनावलं

सरकारी पातळीवर कोणतीही पावले उचलली जाताना दिसत नसल्याने अदर पूनावालांनी केंद्र सरकारला सुनावलं आहे.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : देशात कोरोना लसीकरणाला (Vaccination) सुरूवात झाल्यानंतर केंद्र सरकारने नागरिकांसाठी पहिले दोन डोस मोफत दिले होते. तसेच खासगी रुग्णालयांत पैसे देऊन डोस घेण्याचा पर्याय उपलब्ध होता. पण आता तिसरा म्हणजे प्रतिबंधात्मक डोस (Precaution dose) देण्याची घोषणा करण्यात आली आहे. असे असले तरी याबाबत सरकारी पातळीवर कोणतीही पावले उचलली जाताना दिसत नाहीत. यावरून सिरमच्या अदर पूनावाला (Adar Poonwalla) यांनी मोदी सरकारला सुनावलं आहे. (Corona vaccine)

एका कार्यक्रमात बोलताना अदर पूनावाला म्हणाले की, सरकारी पातळीवर पुन्हा एकदा पहिल्यासारखं वातावरण पाहायला मिळत आहे. नागरिकांच्या आयुष्यावर आपण किमतीचा टॅग लावू शकत नाही. कोरोना लशीच्या दोन डोसमधील अंतर नऊ महिन्यांवरून कमी करून सहा महिन्यांवर आणायला हवे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत नागरिकांना जो त्रास सहन करावा लागला, तो पुन्हा त्यांना सहन करावा लागू नये. मी हे पैसे कमावण्यासाठी म्हणत नसून, मी आधीच तो खूप कमावला आहे.

लस वाया जाऊ नये, म्हणून ती फुकट देण्याची तयारीही मी दाखवली आहे. मी पैशाला महत्व देत असतो तर असे केले नसते. दुसऱ्या लाटेत आपण तातडीने निर्णय घेतले, त्याप्रमाणे बूस्टर डोस आणि लहान मुलांच्या लसीकरणाबाबत निर्णय घेणे ही सध्याची गरज आहे. दुर्दैवाने निर्णय घेण्याचे अधिकार असलेल्या महत्वाच्या व्यक्ती याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यांनी वेळेवर बैठका घेऊन निर्णय घेणे अपेक्षित असताना तसे घडताना दिसत नाही, असेही पूनावाला यांनी स्पष्ट केले.

कोव्हिशिल्डचा बूस्टर डोस 600 रुपयांना मिळेल, असे जाहीर करण्यात आले होते. पण यानंतर सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी या डोसची किंमत केल्याचे जाहीर केले होते. पूनावाला यांनी म्हटले होते की, केंद्र सरकारशी चर्चा केल्यानंतर सिरमने कोव्हिशिल्ड लशीची किंमत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी रुग्णालयांना कोव्हिशिल्ड 600 रुपयांना देण्यात येणार होती. आता तिची किंमत प्रतिडोस 225 रुपये करण्यात आली आहे. केंद्र सरकारने 18 वर्षांवरील सर्वांना प्रतिबंधात्मक डोस घेण्याची सूचना केली आहे. या निर्णयाचेही आम्ही स्वागत करतो.

खासगी लसीकरण केंद्रांवर 18 वर्षांवरील वयोगटासाठी कोविड (Covid 19) प्रतिबंधक लशीचे डोस उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खाजगी लसीकरण केंद्रांवर 10 एप्रिल पासून 18 वर्षांवरील वयोगटाला खबरदारीचे डोस देण्यास सुरुवात झाली आहे. 18 वर्षांहून अधिक वय असलेले आणि दुसरा डोस घेऊन 9 महिने पूर्ण झालेले सर्वजण यासाठी पात्र आहेत. ही सुविधा सर्व खासगी लसीकरण केंद्रांवर उपलब्ध आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT