Adar Poonawalla
Adar Poonawalla  Sarkarnama
देश

ओमिक्रॉनवर कोव्हिशिल्ड लस प्रभावी ठरणार का? अदर पूनावालांनीच दिलं उत्तर

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा (Covid-19) प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. यातच आता ओमिक्रॉनचा (Omicron) धोका मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. कोव्हिशिल्ड (Covishield) लस यावर प्रभावी ठरणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कोव्हिशिल्ड लशीचे उत्पादन सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) करीत आहे. सिरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला (Adar Poonawalla) यांनीच याचे उत्तर दिले आहे.

कोव्हिशिल्ड लशीच्या प्रभावीपणाबाबत पूनावाला यांनी खुलासा केला आहे. 'एनडीटीव्ही'शी बोलताना ते म्हणाले की, कोव्हिशिल्ड लस ओमिक्रॉनवर कितपत प्रभावी ठरते याच्या चाचण्या सुरू आहेत. याबाबत दोन आठवड्यांत माहिती हाती येईल. या विषाणूच्या प्रकाराबाबतही आपल्याला आणखी माहिती जमा करावी लागेल. ऑक्सफोर्डमधील शास्त्रज्ञ यावर संशोधन करीत आहेत. त्यांच्या संशोधनाच्या आधारावर नवी लस आणता येऊ शकते. ती बूस्टर डोससारखे काम करेल. मात्र, यासाठी 6 महिन्यांचा कालावधी लागेल. संशोधनाच्या आधारावर सगळ्यांना तिसरा आणि चौथा डोस लागेल, हे आधीच स्पष्ट झाले आहे.

ओमिक्रॉनसाठी विशिष्ट लसच लागेल, अशी आवश्यकता भासणार नाही. कोव्हिशिल्ड ओमिक्रॉनवर प्रभावी ठरल्यास बूस्टर डोस देण्यासाठी सिरमकडे पुरेसे डोस उपलब्ध आहेत. आमच्याकडे कोट्यवधी डोस आहेत. आम्ही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी 20 कोटी डोस आम्ही राखीव ठेवले आहेत. सरकारने बूस्टर डोसची घोषणा केल्यास आम्ही आधीच तयारी करून ठेवली आहे. सध्या लस न घेतलेले आणि दुसरा डोस न झालेल्यांवर लक्ष केंद्रित करायला हवे, असेही पूनावाला यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, 'द लॅन्सेट इन्फेक्शियस डिसिजेस जर्नल' या संशोधनपत्रिकेत कोव्हिशिल्ड लशीच्या परिणामकारकतेबाबत अभ्यास प्रसिद्ध झाला आहे. भारतात एप्रिल ते मे या कालावधीत कोव्हिशिल्ड लशीची प्रत्यक्ष परिणामकारकता तपासण्यात आली. याचवेळी देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरू होता. कोरोना विषाणूचा डेल्टा हा प्रकार त्यावेळी मोठ्या प्रमाणात संसर्गास कारणीभूत ठरत होता. त्यावेळी देशातील आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आला होता.

दुसऱ्या लाटेतही कोव्हिशिल्ड लशीमुळे संसर्गापासून संरक्षण मिळत होते. पूर्ण लसीकरण झालेल्या नागरिकांमध्ये या लशीची परिणामकारकता 63 टक्के आढळली आहे. मध्यम ते तीव्र संसर्गाच्या काळात लशीची परिणामकारकता सुरवातीला 81 टक्के आढळली होती. यामुळे कोव्हिशिल्ड लस ही नागरिकांना कोरोना विषाणूपासून संरक्षण मिळवून देत असल्याचे समोर आले आहे. आता कोरोना विषाणूचा नवा प्रकार ओमिक्रॉनचा धोका जभभरात वाढू लागला असतानाही कोव्हिशिल्डपासून संरक्षण मिळते का, हे पाहावे लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT