Prem Singh Tamang Sarkarnama
देश

Sikkim Assembly Election 2024 : सिक्कीममध्ये ‘प्रेम-क्रांती’; भाजप 0, काँग्रेस 0... विरोधक चारीमुंड्या चीत

Rajanand More

Sikkim Election Result : सिक्कीम विधानसभा निवडणुकीत ‘क्रांती’ घडली आहे. राज्यात 32 पैकी 31 जागा मिळवत सत्ताधारी सिक्कीम क्रांती मोर्चाने पुन्हा सत्ता काबीज केली आहे. विद्यमान मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांचा करिष्म्यापुढे विरोधकांच्या चारीमुंड्या चीत झाल्या आहेत.

राज्यात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंटला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. मागील निवडणुकीत या पक्षाला 15 तर क्रांती मोर्चाला 17 जागा होत्या. यावेळी विधानसभेत विरोधी बाकांवर एक एकच आमदार बसणार आहे.

देशात प्रमुख राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजप व काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही. एसकेएफला तब्बल 58 टक्के मते मिळाली आहेत. तर एसडीएफला 27 आणि भाजपला पाच टक्के मतांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसला राज्यात एक टक्केही मते मिळालेली नाहीत.

प्रेम सिंह तमांग यांचा करिष्मा

एसकेएमचे अध्यक्ष पीएस गोले उर्फ प्रेम सिंह तमांग यांनी 2019 मध्ये 17 जागांवर विजय मिळवत राज्यात 24 वर्षाहून अधिक काळ सत्तेत असलेल्या चामलिंग सरकारचा पराभव केला होता. यावेळी त्यांनी 32 जागांवर विजय मिळवला असून या विजयाची इतिहासात नोंद होणार आहे.

पवन कुमार चामलिंग यांच्या एसडीएफचे संस्थापक सदस्य असलेल्या प्रेम सिंह तमांग यांनी 2013 मध्ये बंड करत एसकेएमची स्थापना केली. तेव्हापासून त्यांनी चामलिंग यांच्या सरकारविरोधात जोरदार मोर्चा उघडला होता. भ्रष्टाचार, कुशासन असे मुद्दे उपस्थित करून लोकांमध्ये पोहचण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वर्षभरातच झालेल्या निवडणुकीत त्यांना दहा जागा मिळाल्या होत्या.

कोण आहेत तमांग?

तमांग हे सरकारी शाळेमध्ये शिक्षक होते. तीन वर्ष नोकरी केल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. एसडीएफ पक्षाच्या उभारणीत त्यांनी मोठा वाटा उचलला. जवळपास तीन दशकांपासून राजकारणात असलेल्या तमांग यांची वाटचार खडतर राहिली.

1995 नंतर सलग पाचवेळा ते आमदार होते. एसडीएफच्या सरकारमध्ये मंत्री म्हणूनही काम केले. मात्र, 2009 मध्ये त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. त्यामुळे नाराज तमांग यांनी 2013 मध्ये एसकेएमची स्थापना केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT