narendra modi, amit shaha Sarkarnama
देश

Bjp News : ...म्हणून आता भाजपच्या खासदारांनाच नकोय पुन्हा लोकसभेचे तिकीट !

Sachin Waghmare

Delhi News : आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत 400 जागा जिंकण्याचे उद्दिष्ट भाजप नेतृत्वाने ठेवले आहे. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून बूथवाईज सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. विशेषतः प्रत्येक मतदारसंघातील खासदारांच्या कामगिरीचे सूक्ष्मरीत्या मूल्यमापन करून त्यांच्या कामगिरीचे प्रगतीपुस्तक तयार करण्यात आले आहे. याच वेळी आता भाजपच्या गोटातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. भाजपच्या विद्यमान खासदार आता लोकसभा निवडणूक लढविण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे दिसून येत आहे.

भाजपकडून निवडून आलेल्या तीनशेपैकी शंभरहून अधिक विद्यमान खासदारांना उमेदवारी नाकारली जाऊ शकते. त्यामुळे या जवळपास 100 खासदारांनी येत्या काळात निवडणूक रिंगणातून माघार घेण्याची तयारी केली असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. त्यामुळे भाजपकडून यांना उमेदवारी दिली जाणार नाही की काही जण म्हणत असल्याप्रमाणे उमेदवारी नाकारणार, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अनेक विद्यमान खासदारांनी यावर्षीची निवडणूक लढवायची नाही असे ठरवले आहे. सध्या लोकसभेत भाजपचे 303 खासदार आहेत. त्यांच्यातील अनेक जण 2019 च्या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये आले आहेत. ही मंडळी अन्य पक्षांतून किंवा व्यावसायिक आहेत.

या मंडळींनी आपल्या क्षेत्रात नाव कमावलेले आहे. त्यातली काही जण भाजपचे (Bjp) निष्ठावंत आहेत. बरीच वर्षे पक्षकार्यासाठी वाहिलेल्यांपैकी अनेकांनी पक्षाच्या नवीन पिढीसोबत काम करणे कठीण जात आहे. माणूस म्हणून आता आपल्याला काही अर्थ उरलेला नाही, आपण यंत्र झालो आहे, अशी त्यांची भावना झाली आहे. स्वतःसाठी त्यांच्याकडे काही आयुष्य उरले नाही, केवळ पक्षासाठी अहोरात्र राबावे लागत आहे.

पक्षातील ज्येष्ठ नेत्याने काही ट्विट केले तर लगेचच रीट्विट करावे लागते. त्यासाठी उशीर झाला तर लगेच फोन येतो. त्यानंतर दिवसभरात केलेले कामाचे अथवा कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले नाहीत, तर विचारणा होते. त्यासोबतच अधिवेशनकाळात संसदेत सकाळी 11 ते 6 पर्यंत जागेवर हजर नसल्यास लेखी पत्र मिळते.

त्यासोबतच पक्षाच्या कार्यक्रमाना उपस्थित न राहिल्यास विचारणा होते, भाजपच्या अनेक खासदारांना आपण कुठे वेळ घालवत बसलो आहेत, तसे केल्यास वरून कठोर शब्दांत संदेश येतो. त्याशिवाय विविध कार्यक्रमांत सहभागी व्हावे लागत असल्याने प्रचंड मानसिक दडपण येते. या पार्श्वभूमीवर बऱ्याच जणांनी पुन्हा उमेदवारी न मागण्याचे ठरवले असल्याचे समजते. यावर राजधानी दिल्लीच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. त्यामुळे आता असे बोलले जात असले तरी प्रत्यक्ष काय होते, हे कळण्यासाठी आता पुढचे काही दिवस तरी वाट पाहावी लागणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

युवा चेहऱ्यांना संधी देणार...

दुसरीकडे भाजपच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, दोन टर्मपेक्षा अधिक काळ काम करणाऱ्या बऱ्याच खासदारांना आता भाजप (Bjp) पक्ष संघटनेत काम करण्याची संधी दिली जाणार आहे. त्या माध्यमातून येत्या काळात अनेक खासदारांच्या जागी युवा चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे. त्यांना संघटनेत वेगळी जबाबदारी दिली जाणार आहे.

उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम

विशेषतः नुकत्याच पाच राज्यांत झालेल्या निवडणुकीत 21खासदारांना विधानसभेच्या निवडणूक रिंगणात उतरवले होते. त्यांपैकी 13 जण विजयी झाले आहेत. त्यामुळे येत्या काळात भाजपकडून 100 जणांपेक्षा अधिक खासदारांना येत्या काळात नारळ देण्याचे ठरवले असल्याचे समजते. त्यामुळे भाजप उमेदवार देणार नाही की काही जण म्हणत असल्याप्रमाणे उमेदवारी नाकारणार, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

(Edited by Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT