Sonia Gandhi Book Sarkarnama
देश

Sonia Gandhi Rajiv Gandhi love story : राजीव गांधींचा मृदू स्वभाव जिंकून गेला मन; सोनिया गांधींच्या पुस्तकातून उलगडणार प्रेमकहाणी

Sonia Gandhi recalls her first meeting with Rajiv Gandhi Cambridge upcoming book, Belonging: A Journey of Love, releasing November 10 : सोनिया गांधी यांनी इंस्टाग्रामवर पदार्पण केल्यानंतर शनिवारी ‘एक्स’ या समाजमाध्यमावरही खाते सुरू केले. त्यांचे ‘Belonging: A Journey of Love’ हे पुस्तक 10 नोव्हेंबरला प्रकाशित होणार आहे.

Pradeep Pendhare

Sonia Gandhi Book : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी आगामी पुस्तकाच्या निमित्ताने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासोबतच्या प्रेमकहाणीतील आठवणींना उजाळा दिला आहे.

केंब्रिजमधील एका छोट्या ग्रीक उपाहारगृहात राजीव गांधी यांच्याशी झालेली पहिली भेट, त्यांचा मृदू स्वभाव आणि त्यांच्यासोबतच्या आयुष्याची सुरुवात यांविषयी त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. ‘Belonging: A Journey of Love’ असे त्यांच्या आगामी पुस्तकाचे नाव असून, ते 10 नोव्हेंबरला प्रकाशित होणार आहे.

सोनिया गांधी यांनी इंस्टाग्रामवर पदार्पण केल्यानंतर शनिवारी ‘एक्स’ या समाजमाध्यमावरही खाते सुरू केले. या माध्यमावरील पहिल्याच पोस्टमध्ये त्यांनी आगामी पुस्तकाचा व्हिडिओ प्रसिद्ध केला. या व्हिडिओत त्यांनी राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांच्याशी झालेल्या पहिल्या भेटीचा प्रसंग सांगितला. त्यावेळची काही छायाचित्रे आणि दोघांची भेट झालेल्या उपाहारगृहाचे छायाचित्रही त्यांनी दाखविले.

‘केंब्रिजमधील एका छोट्या ग्रीक उपाहारगृहात माझ्या प्रेमाच्या प्रवासाची सुरुवात झाली. राजीव आणि मी प्रेम, हास्य आणि आठवणींनी भरलेले एक विश्व निर्माण केले. 10 नोव्हेंबरला हे जग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे,’ असे सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी ‘एक्स’वरील पहिल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

राजीव गांधी यांच्या प्रेमात पडण्याचा अनुभव सांगताना त्यांनी त्या काळातील इंग्लंडमधील खाद्यसंस्कृतीचाही उल्लेख केला. त्या काळात इंग्लंडमधील जेवण फारसे चांगले नव्हते आणि आजच्याइतकी उपाहारगृहेही नव्हती. त्यामुळे विशेषतः इटालियन पद्धतीचे जेवण मिळेल, अशा ठिकाणाच्या त्या शोधात असायच्या.

याच शोधात त्यांना ‘व्हर्सिटी रेस्टॉरंट’ हे ग्रीक उपाहारगृह सापडले. तिथेच त्यांची राजीव गांधी यांच्याशी पहिली भेट झाली. पहिल्याच भेटीत या व्यक्तीसोबत राहायला आपल्याला आवडेल, असे वाटल्याची आठवण सोनिया गांधी यांनी सांगितली. पुढे राजीव गांधी यांच्याही मनात आपल्याबद्दल अशीच भावना असल्याचे त्यांना समजले. एका सामायिक मित्राने दोघांची ओळख करून दिली आणि त्यानंतर त्यांच्या मैत्रीला सुरुवात झाली.

राजीव गांधींच्या मृदू स्वभावाने जिंकले मन

राजीव गांधी यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी बोलताना सोनिया गांधी म्हणाल्या की, ते खूप देखणे होते; मात्र त्यांचा मृदू स्वभाव त्यांना विशेष भावला. त्यांना पहिल्यांदा भेटलेला क्षण आपण कधीही विसरणार नाही, अशी आठवणही त्यांनी पुस्तकातून व्यक्त केली आहे. सोनिया गांधी यांच्या आगामी पुस्तकातून राजीव गांधी यांच्यासोबतच्या वैयक्तिक आठवणी आणि त्यांच्या नात्यातील भावनिक पैलू वाचकांसमोर येणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT