

Siddaramaiah sting operation arrest : माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधातील कथित स्टिंग ऑपरेशन प्रकरणात बंगळूरच्या केंद्रीय गुन्हे शाखेच्या (सीसीबी) पोलिसांनी शनिवारी दिल्लीतील रितेश पांडे याला अटक केली.
या प्रकरणातील ही पहिली अटक आहे. या प्रकरणातील व्हिडिओ चित्रीकरणासाठी रितेश पांडे याने मोबाईल फोन खरेदी केल्याचा आरोप आहे. दिल्ली येथे त्याला अटक केल्यानंतर पोलिसांनी बंगळूरला आणले. सीसीबीच्या सायबर गुन्हे विभागाकडून त्याची अज्ञातस्थळी चौकशी सुरू आहे.
दरम्यान, या प्रकरणाच्या तपासासाठी काँग्रेस (Congress) नेत्या कृपा अल्वा यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याची नोटीस बजावल्यानंतर त्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याचे वृत्त सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आले आहे.
सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांनी शुक्रवारी म्हैसूर येथे पत्रकारांशी बोलताना या स्टिंग ऑपरेशनमागे काँग्रेस नेत्या कृपा अल्वा आणि कन्नड वृत्तवाहिनीशी संबंधित राकेश शेट्टी यांचा हात असल्याचा आरोप केला होता. या आरोपांची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.
दरम्यान, स्टिंग ऑपरेशन प्रकरणात काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी असल्याची कबुली संबंधित नेत्यांनी दिल्यानंतरही या प्रकरणातून आपल्याविरोधात संशय निर्माण करण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री व माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी केला. हासन जिल्ह्यातील माविनकेरे येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकार आणि गृहमंत्री प्रियांक खर्गे यांच्यावर निशाणा साधला.
काँग्रेस नेते प्रियांक खर्गे यांनी कुमारस्वामी यांच्या निकटवर्तीयांबाबत केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना त्यांनी, कोण पळून गेले आणि का पळून जाईल, असा सवाल केला. कर्नाटक लोकसेवा आयोगाच्या (केपीएससी) कथित घोटाळ्यासह पंचायत विकास अधिकारी (पीडीओ), सहायक कार्यकारी अभियंता (एईई), पशुवैद्यकीय अधिकारी आणि प्रादेशिक परिवहन विभागातील भरतीप्रकरणांमध्ये सरकारने किती सत्य बाहेर आणले, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
स्टिंग ऑपरेशन कोणी केले, त्यामागील उद्देश काय होता आणि अनेक वर्षांनंतर त्याची ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमांवर का प्रसारित करण्यात आली, याचा तपास करून सत्य उघड केले जाईल, असे गृहमंत्री प्रियांक खर्गे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.